आजीची मध्यस्थी अन् गणपतराव देशमुखांच्या दोन नातवांमधील वाद मिटला; सांगोल्यातून शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवारही ठरला!
Sangola Vidhansabha Election : सांगोल्यातील देशमुख बंधूंचा वाद आजीच्या मध्यस्थीमुळे अखेर मिटला आहे. तर सांगोल्यातून डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या उमेदवारीची घोषणाही आज करण्यात आली आहे.
Sangola Vidhansabha Election : सांगोला विधानसभा मतदारसंघ हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. दरम्यान, सांगोला विधानसभेची जागा ही पारंपारिक शेतकरी कामगार पक्षाकडे असताना महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे गटाला दिल्याने शेकाप बंडखोरी करण्याच्या तयारीत होता. अशातच गेल्या अनेक दिवसांपासून स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे दोन नातू डॉक्टर अनिकेत देशमुख आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या गटात वाद सुरू होता. तर आगामी विधानसभेच्या अनुषंगाने शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज सांगोल्यात मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या दोन नातू नातवांमध्ये सुरू असलेला वाद अखेर आज मिटला असून दोघांचे मनोमिलन झाले आहे.
आजीच्या मध्यस्थीने दोन भावंडांमधील वाद मिटला
शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात आज स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या दोन नातवांचे मनोमिलन आजी रतनताई देशमुख यांनी हजारो समर्थकांच्या समोर घडविला. सांगोला विधानसभा मतदारसंघ हा शेकापचा बालेकिल्ला होता, आहे आणि राहील, अशी भूमिका घेत सांगोल्यातून डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या उमेदवारीची घोषणा शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी मेळाव्यात केली. यावेळी त्यांचे चुलत बंधू डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी या निर्णयास पाठिंबा देत स्टेजवर उपस्थित असलेल्या स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या पत्नी श्रीमती रतनताई देशमुख यांना आम्ही दोघे भाऊ एकत्रच राहणार असल्याची ग्वाही दिली.
सांगोल्यात शेकापचा लालबावटा फडकेलच- बाबासाहेब देशमुख
दरम्यान सांगोल्याची जागा महाविकास आघाडी मधून शेतकरी कामगार पक्षालाच मिळणार, असा दावा भाई जयंत पाटील यांनी केला आहे. दुसऱ्या बाजूला अजितदादांची साथ सोडत उद्धव ठाकरे गटात गेलेले माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांना ठाकरे गटाने उमेदवारीसाठी ए बी फॉर्म दिल्याने ही जागा महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाला सुटणार, की शेकापला हा तेढ पुन्हा निर्माण झाला आहे. दरम्यान, जागा कोणाला जरी सुटली तरी सांगोल्यातून शेकापचा लालबावटा फडकेल, असा दावा डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केलेला आहे .
तिरंगी लढतीत कोणाचा फायदा होणार?
गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार शहाजी बापू पाटील व दीपक आबा साळुंखे हे एकत्र असूनही शहाजी बापू हे केवळ 768 मताने विजयी झाले होते . गणपतराव देशमुख यांच्या जाण्याने आता पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्ष एक संघ बनला असून आता शेतकरी कामगार पक्षाची लढाई शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील व शिवसेना ठाकरे गटाचे दीपक आबा साळुंखे यांच्यामध्ये होणार आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघात तब्बल 55 वर्ष स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी प्रतिनिधित्व केले होते. गेल्या निवडणुकीत शहाजी बापू पाटील व दीपक आबा साळुंखे एकत्र आल्याने शेतकरी कामगार पक्षाचा निसटता पराभव झाला होता. आता शहाजी बापू पाटील व दीपक साळुंखे हे दोघेही निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने शेतकरी कामगार पक्षाला या वेळेला पुन्हा एकदा सांगोल्यावर लालबावटा फडकवण्याची संधी असणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या