(Source: ECI | ABP NEWS)
Hyderabad Balloon Flights : हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
High Altitude Scientific Balloon Flights : अशी उपकरणे किंवा पॅराशूट आढळल्यास ती उघडू किंवा हाताळू नयेत. अशा उपकरणांशी छेडछाड केल्यास मौल्यवान वैज्ञानिक माहिती नष्ट होऊ शकते.

जळगाव : एका महत्त्वाच्या संशोधनासाठी हैदराबादहून बलून उड्डाणाचा (Hyderabad Balloon Flights) प्रयोग करण्यात येणार असून वाऱ्याच्या दिशेनुसार ही उपकरणे महाराष्ट्रातील जळगाव तसेच मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पडण्याची शक्यता आहे. असं जर झालं तर नागरिकांनी त्याला हात लावू नये किंवा ती हाताळू नये. त्यामुळे महत्त्वाचा डेटा नष्ट होऊ शकतो. तसेच हे बलून आणि त्यातील उपकरणे काही ठिकाणी पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन (Public Alert for Balloon Equipment Landing) करण्यात आलं आहे. जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी यासंबंधी माहिती दिली.
भारत सरकारच्या अणुऊर्जा विभाग (Department of Atomic Energy) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांच्या संयुक्त विद्यमाने हैदराबादहून 25 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान सुमारे 10 हाय अल्टिट्यूट वैज्ञानिक बलून उड्डाणे (High-Altitude Scientific Balloon Flights) करण्यात येणार आहेत. हे उड्डाण टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) आणि ईसीआयएल, हैदराबाद येथील बलून सुविधा केंद्रातून (Balloon Facility Centre) होणार आहे. या प्रयोगांतून महत्त्वाचे अंतराळ संशोधन होणार आहे.
ही बलून उड्डाणे महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने 1959 पासून केली जात आहेत. बलून हायड्रोजन वायूने भरलेली असून त्यांचा व्यास 50 ते 85 मीटर इतका असतो. ही बलून 30 ते 42 किलोमीटर उंचीवर वैज्ञानिक उपकरणे वाहून नेतात आणि प्रयोग पूर्ण झाल्यानंतर रंगीत पॅराशूटच्या (Parachute System) सहाय्याने जमिनीवर उतरतात.
Balloon Flights Possible Affected Districts : कोणत्या जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता?
वाऱ्याच्या दिशेनुसार ही उपकरणे हैदराबादपासून 200 ते 350 किलोमीटर अंतरावर पडू शकतात. त्यामुळे महाराष्ट्रातील औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, सांगली, सातारा, अहमदनगर, नागपूर, जळगाव, सोलापूर, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यांत उपकरणे उतरण्याची शक्यता आहे.
Public Safety Advisory : नागरिकांसाठी सूचना
अशी उपकरणे किंवा पॅराशूट (Scientific Equipment / Parachute) आढळल्यास ती उघडू किंवा हाताळू नयेत. काही उपकरणांवर उच्च विद्युत दाब (High Voltage) असू शकतो, त्यामुळे त्यांना हाताळल्यास धोका संभवतो. तसेच अशा उपकरणांशी छेडछाड केल्यास मौल्यवान वैज्ञानिक माहिती (Scientific Data) नष्ट होऊ शकते.
Contact & Reporting Procedure : संपर्क साधण्याची प्रक्रिया
अशा वस्तू आढळल्यास नागरिकांनी जवळचे पोलीस ठाणे, पोस्ट ऑफिस किंवा जिल्हा प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधावा. तसेच संचालक, बलून सुविधा केंद्र, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, ईसीआयएल, हैदराबाद येथे फोन किंवा संदेश पाठवावा. उपकरणांची सुरक्षित परतफेड करणाऱ्या नागरिकांना बक्षीस आणि झालेला खर्च परत दिला जाणार आहे. मात्र, छेडछाड झाल्यास बक्षीस दिले जाणार नाही.
Administrative Instructions : प्रशासनाला सूचना
स्थानिक प्रशासनाने ही माहिती गावपातळीपर्यंत पोहोचवावी आणि स्थानिक भाषेत जनजागृती करावी. पहिले बलून उड्डाण ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात होणार असून, सर्व आवश्यक तयारी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च यांनी दिले आहेत.
























