Sada Sarvankar Mahim: सदा सरवणकर म्हणाले, 'आम्हाला पक्ष जिवंत ठेवायचाय, मला माहीममधून लढावचं लागेल'
mahim vidhan sabha constituency: माहीम विधानसभा मतदारसंघात अमित ठाकरे विरुद्ध महेश सावंत विरुद्ध सदा सरवणकर अशी लढत आहे.
मुंबई: माहीम मतदारसंघात शिवसेना पक्ष जिवंत ठेवण्यासाठी या भागातून विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाचा उमेदवार लढणे आवश्यक आहे, असे वक्तव्य शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी केले. पक्ष आणि कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी नेत्यांना असे निर्णय घ्यावे लागतात. मी गेल्या 15 वर्षांपासून दादर भागात लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे. या भागात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची जनता राहते. त्यामुळे याठिकाणी शिवसेनेचा उमेदवार न देऊन येथील शाखांचं आणि कार्यकर्त्यांचं काय करायचं, हा प्रश्न आहे. त्यामुळे मला माहीम विधानसभेतून (Mahim Vidhan Sabha constituency) लढणे आवश्यक आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रामदास आठवले साहेबांच्या आशीर्वादाने हे सगळे करत असल्याचे सदा सरवणकर यांनी सांगितले. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
माहीम विधानसभा मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे रिंगणात उतरले आहेत. लोकसभेला मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे शिंदे गटाने या मतदारसंघातून अमित ठाकरे यांना मोकळी वाट करुन द्यावी, अशी मनसेची अपेक्षा होती. मात्र, महायुतीच्या नेत्यांनी समजूत काढल्यानंतरही सदा सरवणकर हे माहीम विधानसभेतून लढण्यावर ठाम आहेत. यावरुन मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संकुचित वृत्तीचे नेते असल्याची टीका केली होती. या टीकेला सदा सरवणकर यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, यशवंत किल्लेदार हे किती मोठे कार्यकर्ते आहेत, ते माहिती नाही. पण आम्ही आजही राजसाहेबांचा आदर करतो. मुख्यमंत्री असूनही एकनाथ शिंदे राज ठाकरे यांना अनेकदा भेटायला गेले आहेत. त्यामध्ये आदराची भावना होती, ती आजही आहे. पण शेवटी प्रत्येक नेत्याला पक्ष आणि कार्यकर्ते सांभाळणे गरजेचे असते. त्यामुळे काही निर्णय घ्यावे लागतात, असे सांगत सदा सरवणकर यांनी माहीममधून लढण्याच्या निर्णयाचे समर्थन केले.
एखादी गोष्टी दिली तर चांगला आणि नाही दिली तर वाईट, ही आमची वृत्ती नाही. माहीम विधानसभेतील साडेतीन ते चार लाख जनतेला आपल्यातला आमदार हवा आहे. या भावनेचा मान राखणे हे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे. मी महायुतीचा उमेदवार म्हणून माहीममधून लढणार आहे. येथील लोकांना त्यांना सहजपणे भेटणारा आणि 365 दिवस मदतीला उपलब्ध असलेला लोकप्रतिनिधी हवा आहे, असे सदा सरवणकर यांनी म्हटले. यावेळी त्यांनी शिवाजी पार्कच्या दिपोत्सवातील मनसेच्या चिन्हाचे कंदील लावण्याच्या वादावरही भाष्य केले. सगळ्यांनी आदर्श आचारसंहिता पाळायला हवी. त्यामुळे शिवाजी पार्कमधील मनसेचे चिन्ह असलेले कंदील उतरवले यात गैर काय, असा सवाल सदा सरवणकर यांनी उपस्थित केला, असे सदा सरवणकर यांनी म्हटले.
आणखी वाचा