अजित दादांची तंबी, मुख्यमंत्र्यांचा इशारा हवेतच विरला? नवनीत राणांचा महायुतीच्या विरोधात प्रचार सुरूच!
Vidhan Sabha Election 2024 : दर्यापूरमधील महायुतीचे उमेदवार अभिजित अडसूळ यांच्या विरोधात उभे असलेले भाजपमध्ये बंडखोरी करणारे रमेश बुंदीले यांच्या प्रचार नवनीत राणा करत असल्याचे दिसून आले आहे.
Maharashtra Politics अमरावती : अमरावतीच्या भाजप कार्यालयात काही दिवसांपूर्वी बडनेराचे उमेदवार रवी राणा (Ravi Rana) यांची बैठक झाली. त्यामध्ये रवी राणा यांनी अमरावतीची एक जागा कमी झाली तरी चालेल पण कमळ निवडून आले पाहिजे, असे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर महायुतीत (Mahayuti) नव्या वादाला तोंड फुटलं.
दरम्यान याच मुद्द्यावरून आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुलभा खोडके विरुद्ध राणांमध्ये खडाजंगी रंगली असताना अजित पवारांकडून रवी राणांची कानउघडणी करण्यात आलीय. त्यानंतर काल भर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राणा दाम्पत्याला इशारा देत महायुतीची शिस्त पाळण्याचा सल्ला दिला आहे. मात्र अजित दादांनी दिलेली तंबी आणि मुख्यमंत्र्यांचा इशारा हवेतच विरला का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. कारण दर्यापूरमधील महायुतीचे उमेदवार अभिजित अडसूळ (Captain Abhijeet Adsul) यांच्या विरोधात उभे असलेले भाजपमध्ये बंडखोरी करणारे रमेश बुंदीले यांच्या प्रचार नवनीत राणा करत असल्याचे दिसून आले आहे.
अजित दादांची तंबी, मुख्यमंत्र्यांचा इशारा हवेतच विरला?
दर्यापूरमध्ये महायुती कडून शिंदे शिवसेनेने अभिजित अडसूळ यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपचे माजी आमदार रमेश बुंदीले यांनी बंडखोरी करत युवा स्वाभिमान पार्टीकडून उमेदवारी घेतलीय. दरम्यान, त्याच रमेश बुंदीले यांचा प्रचार करण्यासाठी काल रात्री भाजप नेत्या नवनीत राणा यांनी दर्यापूर मतदार संघात प्रचार सभा घेतल्या. मात्र, काल दुपारीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दर्यापूरमध्ये सभा झाली. ज्यामध्ये शिंदेंनी महायुतीचा धर्म पाळावा, असा दम राणा दाम्पत्यांना दिला. तरीही नवनीत राणा यांनी रमेश बुंदीलेसाठी दोन ठिकाणी सभा घेतल्या आहेत. त्यामुळे अमरावतीत महायुतीत सारे काही अलबेल असल्याचे चित्र आहे का? असे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले आहे.
राणा दाम्पत्याने महायुतीत राहून बंडखोरी करू नये- एकनाथ शिंदे
लोकसभेत महायुतीचे सरकार तुमच्या पाठीशी उभे राहिले, महायुतीमध्ये कॅप्टन अभिजीत असून ते देखील आमच्या सरकारसाठी गरजेचे आहेत. महायुतीची शिस्त राणा दाम्पत्याने पाळावी. महायुतीत राहून बंडखोरी करू नये, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी राणा दाम्पत्याला दिला आहे. आगामी काळात महायुतीच्या कामाची पोच पावती जनता दिल्याशिवाय राहणार नाही. हे सरकार सर्वसामान्य जनतेसाठी आहे. मतदारसंघातले सगळे प्रश्न आपण मार्गी लावू. त्यासाठी 20 तारखेला कॅप्टन अभिजीत अडसूळ यांचं विमान उडवा असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी जनतेला केलंय.
हे ही वाचा