महिलांना सन्मान अन् सुरक्षितता, शेतमालाला हमीभाव, मोफत शिक्षण ते एमपीएससीद्वारे नोकरभरती, नाना पटोलेंनी मविआचं धोरण मांडलं
Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात विविध मुद्यांवर भाष्य केलं.
मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात उपस्थिती लावत विविध मुद्यांवर भाष्य केलं. महिला, मुलींची सुरक्षितता, शेतकऱ्यांचे प्रश्न, आरोग्य आणि शिक्षण व्यवस्थेतील बदल, नोकरभरती या मुद्यांवर नाना पटोले यांनी भाष्य केलं. महाविकास आघाडीचं सरकार आल्यास या घटकांसाठी कोणतं काम करणार हे नाना पटोलेंनी सांगितलं.
नाना पटोले म्हणाले, महिलांना सन्मान देण ही प्राथमिकता, लहान मुली शाळेत किंवा बाहेर असतील त्या सुरक्षित राहिल्या पाहिजेत, आमचं सरकार काम करेल, असं सांगितलं.
शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र निर्माण करायचा आहे. अन्नदात्याला ताकद देणं, कर्जातून मुक्त करणं, शेतमालाला योग्य भाव देणं ही आमची प्राथमिकता आहे, असं पटोले यांनी स्पष्ट केलं.
आरोग्य व्यवस्था आणि शैक्षणिक व्यवस्थेमध्ये स्थिती निर्माण झालेली पाहता, या क्षेत्रातील पदं भरणार आहोत.अत्याधुनिक व्यवस्था शासकीय दवाखान्यात निर्माण करणार आहोत. काही आजारांच्या खर्चासाठी 25 ते 30 लाख रुपये लागतात ते देण्याचा निर्णय घेणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं. शैक्षणिक व्यवस्थेत बदल करण्याची गरज आहे. गरिबांची मुलं, शेतकरी, शेतमजुरांची मुलं आता शिकू शकत नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षण मोफत होतं, भाजपनं आणि त्यांच्या युतीनं शिक्षण विकत घेण्याचं काम केलं, असा आरोप नाना पटोले यांनी केला.आम्ही शाळेतील मुलांना मोफत दोन ड्रेस, पुस्तक देण्याचा निर्णय घेतला होता, या सरकारला दिवाळी आली तरी ते पोहोचवता आलेलं नाही. मूठभर लोकांच्या हातात शिक्षण द्यायचं चंद्रपूर पासून सुरु झालेलं आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं.
शिक्षण, आरोग्य घटनात्मक मोफत आहे , कोण उपकार करत नाही, ते मोफत दिलं पाहिजे पण दर्जा असला पाहिजे,असं नाना पटोलेंनी म्हटलं.
लोकसभा निवडणुकीपूर्वी महिलांना मोफत साड्या वाटल्या होत्या, पालघर सारख्या आदिवासी भागात साड्या वाटल्या होत्या, त्या साड्या महिलांनी तहसीलदार कार्यालयात नेऊन टाकल्या, काहींनी त्या साड्या पेटवल्या, असं नाना पटोले म्हणाले. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात बदल घडवू, प्रत्येक माणसाला या बाबतीत न्याय मिळाला पाहिजे, यासाठी काम करणार आहोत, असं नाना पटोलेंनी म्हटलं.
नोकर भरतीची परीक्षा एमपीएससीद्वारे भरली जातील. कंत्राटी तत्वावर भरती केली जाणार नाही. कंत्राटदारांच्या माध्यमातून मुलांना नोकरीत घेतलं जाणार नाही,असं नाना पटोले यांनी म्हटलं. महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न करणार, महागाई कमी करुन गरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे, असंही ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण करणं हे आमचं स्वप्न : नाना पटोले
छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे रयतेचं राज्य निर्माण केलं होतं. शिवाजी महाराजांनी ज्या अपेक्षेनं राज्य निर्माण केलं, त्याप्रमाणं रयतेचं राज्य राहावं आणि शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण व्हावं हे आमचं स्वप्न आहे. शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण आम्हाला करायचं नाही.शिवाजी महाराजांची प्रतिमा बांधायची, त्याच्यात कमिशन खाऊन शिवाजी महाराजांच्या विचारांचा अवमान करण्याच काम आम्ही करणार नाही, असं नाना पटोले यांनी म्हटलं.
आम्ही जातनिहाय जनगणना करणार आहोत. जनगणना करणार असाल तर त्याचा उपयोग नाही. जातनिहाय जनगणना केली तर प्रत्येक जातीच्या कुटुंबाचं आर्थिक आणि शैक्षणिक रिपोर्ट आमच्याजवळ येईल. प्रत्येकाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम त्या माध्यमातून करता येईल, असं नाना पटोले म्हणाले.
महाराष्ट्रात अनेकांना राहायला घरं नाहीत, त्यांना घरं देणार आहोत. मच्छीमारांचा प्रश्न आहे, गोड्या पाण्याचे तलाव मच्छीमारांना दिले जातील. खाऱ्या पाण्यातील मासेमारी करताना मच्छीमारांना होणारा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत, असंही पटोले यांनी स्पष्ट केलं.
इतर बातम्या :