Raj Thackeray : कोणत्या बहिणीने फुकट पैसे मागितले? अशाने महाराष्ट्र दिवाळखोरीत निघेल; लाडकी बहिण योजनेवरून राज ठाकरेंनी फटकारले
कोणीही फुकटं काही मागितलेलं नाही. फुकट पैसा महिना, दोन महिना पुरेल, पण महाराष्ट्र दिवाळखोरीत निघून कंगाल होईल. राज्यावरील एक लाख कोटींवर कर्ज होईल, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फटकारले आहे.
Raj Thackeray : लोकांना फुकट देण्यास सुरुवात केल्यास लोकांना आपण लाचार करत आहोत. तरुणांना पैसे दिल्यास तो काही काम करणार नाही, ड्रग्ज तसेच अन्य काही घेण्यास सुरुवात करेल. हाताला कामं देणं हे सरकारचं काम आहे. शेतकऱ्याने सुद्धा वीज फुकट मागितलेली नाही. वीजेमध्ये सातत्य द्या, नीट द्या, थोडी कमी भावात द्या, कोणीही फुकटं काही मागितलेलं नाही. फुकट पैसा महिना, दोन महिना पुरेल, पण महाराष्ट्र दिवाळखोरीत निघून कंगाल होईल. राज्यावरील एक लाख कोटींवर कर्ज होईल, अगोदरची कर्ज फिटलेली नाहीत, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फटकारले आहे.
एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन या विशेष कार्यक्रमात राज ठाकरे यांनी प्रकट मुलाखत दिली. यावेळी राज ठाकरे भूमिका सातत्याने भूमिका का बदलतात, स्वबळाचा निर्णय, अमित ठाकरेंचा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय आदी निर्णयांवरून भाष्य केले.
तुमच्याकडे कोणी काही फुकट मागत नसतं
लाडकी बहिणी योजनेचं काय होणार आहे यापेक्षा कोणतीच गोष्ट कोणालाही फुकट देऊ नये, कारण तुमच्याकडे कोणी काही फुकट मागत नसतं. महाराष्ट्रामधील ज्या माझ्या भगिनी आहेत त्या भगिनींना सक्षम बनवा. चांगले उद्योगधंदे आणा, चांगल्या गोष्टी करा, त्यांना सक्षम बनवा त्यांच्याकडे त्यांच्या मेहनतीचे पैसे येऊ द्या, त्यांनी कुठलं म्हटलं आहे फुकटं येऊ द्या, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहिण योजनेवरून फटकारलं आहे.
अजित पवार यांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही
राज यांनी राज्यात मनसेच्या साथीनं महायुतीचा मुख्यमंत्री होईल, असा दावा केला. तसेच हे सोपं नसल्याचेही म्हटले आहे. महाराष्ट्रात जो राजकीय चिखल झाला आहे त्याला शरद पवार कारणीभूत असल्याचा आरोप राज यांनी केला. त्यांनीच फोडाफोडीची सुरुवात केल्याचे राज ठाकरे म्हणाले. अजित पवार यांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही, ही त्यांची एक आवडणारी गोष्ट असल्याचे ते म्हणाले. राज ठाकरे यांनी रामदास आठवलेंवर निशाणा साधला. मंत्री किंवा मुख्यमंत्री होऊ न शकल्याच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, रामदास आठवलेंसारखा मंत्री होण्यापेक्षा माझा पक्ष बंद केलेला बरा. लोक काय विचार करतात याची मला पर्वा नाही. पक्ष चालवताना अनेक अडचणी येतात, हे बाहेर बसून समजू शकत नाही.
इतर महत्वाच्या बातम्या