मोठी बातमी : KDMC मध्ये मनसेकडून AB फॉर्मचे वाटप, 112 पैकी 50 जागांवर तयारी, ठाकरेंच्या सेनेला किती जागा?
KDMC Election: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 112 जागा असून यामधील 50 जागांसाठी मनसेकडून तयारी करण्यात आली आहे. या जागांवर उमेदवार निश्चित झाले असून त्यांना एबी फॉर्म रवाना झाले आहेत.

KDMC Election: मुंबई महानगर परिसरातील तसेच राज्यातील पुणे नाशिक आदी महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना यांची युती झाल्यानंतर आता उमेदवार निश्चितीसाठी वेग आला आहे. मुंबई महानगरपालिका संदर्भात अजूनही काही जागांवर चर्चा सुरू असतानाच कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं 50 जागांवर शड्डू ठोकला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 112 जागा असून यामधील 50 जागांसाठी मनसेकडून तयारी करण्यात आली आहे. या जागांवर उमेदवार निश्चित झाले असून त्यांना एबी फॉर्म रवाना झाले आहेत. मनसे माजी आमदार राजू पाटील शिवतीर्थवरून उमेदवारांचे अर्ज घेऊन रवाना झाले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 112 जागा असल्या तरी ठाकरेंच्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी इतर जागा सोडण्यात आल्या आहेत. पुढील 48 तासांमध्ये मनसेकडून कल्याण डोंबिवलीमधील उमेदवारांना AB फॉर्मचे वाटप केलं जाणार आहे. शेवटच्या दोन दिवसात सर्व अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेसोबत युती नको, महायुतीत वादाची ठिणगी
दुसरीकडे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना–भाजप युती होणार की दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. युतीसंदर्भात भाजप आणि शिवसेना समन्वयक समितीच्या बैठका सुरू असतानाच, काही भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेसोबत युती नको, स्वबळावरच निवडणूक लढावी, असा ठाम पवित्रा घेतला आहे. तर युती झालीच, तर महापौरपदासह स्थायी समितीची महत्त्वाची पदे मिळावीत, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत असल्याचं भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी म्हटलं आहे.
अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार
कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपकडून महापौरपद आणि तीन वर्षांसाठी स्थायी समिती सभापती पदाची मागणी करण्यात आली आहे. यावर अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे. कार्यकर्त्यांची भूमिका स्पष्ट असून भाजपने स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी त्यांची इच्छा असल्याचं नरेंद्र पवार यांनी नमूद केलं. युती झाल्यास अनेक कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळणार नाही, त्यामुळे नाराजी वाढू शकते, असंही त्यांनी सांगितलं. युती झाल्यास भाजपचं नुकसान होईल, असा दावा करत नरेंद्र पवार म्हणाले की, प्रत्येक कार्यकर्ता निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. युती झाली, तरी बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे अंतर्गत संघर्ष वाढेल. हीच बाब समन्वयक समितीच्या प्रतिनिधी म्हणून आपण वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
इतर महत्वाच्या बातम्या




















