MVA Seat Sharing Formula : महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला समोर, 90-90-90 जागा तीन पक्ष लढवणार, बाळासाहेब थोरातांनी दिली मोठी अपडेट
Balasaheb Thorat : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा नवा फॉर्म्युला सांगितला आहे.
Maharashtra Assembly Election नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नवी दिल्लीत आहेत. बाळासाहेब थोरात यांनी नवी दिल्लीत बोलताना महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला सांगितला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात देखील थोरात यांनी भाष्य केलं आहे. मित्रपक्षांना आम्ही 18 जागा दिलेल्या आहेत. आता तीन राजकीय पक्षांचा फॉर्म्युला 85-85-85 वरुन 90-90-90 वर पोहोचला असल्याचं त्यांनी म्हटलं.
बाळासाहेब थोरात म्हणाले की आम्ही चर्चा करत आहोत, आमचे उमेदवार सक्षम आहेत त्यांच्याबाबत चर्चा झाली आहे. सीईसी पुढे ही नाव आम्ही ठेवणार आहे. महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत कोठेही करणार नाही, असं देखील बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. राज्याची निवडणूक आहे, त्यामुळं काही अडचणी असतात त्या आम्ही सोडवत असतो, असं देखील बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.
बाळासाहेब थोरात यांनी पुढे म्हटलं की 18 जागा आम्ही मित्रपक्षांना ठेवल्या आहेत. त्यातून किती सुटतील बघू असं देखील ते म्हणाले. आमचा 85-85-85 चा फॉर्म्युला आता 90-90-90 झाला आहे. काँग्रेस 100 च्या पुढे जाणार का याची अजून बेरीज केली नाही, असं देखील बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.
काँग्रेसकडून 48 नावांची पहिली यादी
काँग्रेसनं काल पहिल्यांदा 48 जागांची यादी जाहीर केली. यामध्ये विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. महाविकास आघाडीकडून कालपर्यंत 158 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 45, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 65 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. महाविकास आघाडीतील उर्वरित जागांवर उमेदवार कधी जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नाना पटोले काय म्हणाले?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वच जागांवर सीईसी मध्ये शिक्कामोर्तब होईल,पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील,असं सांगितलं. आज 55 जागांवर चर्चा झाली आहे. मैत्रीपूर्ण लढतींचा अद्याप निर्णय घेतला नाही. देवेंद्र फडणवीसांना किती समजतं माहित नाही, असा टोला देखील पटोले यांनी लगावला.
राहुल गांधींचं वक्तव्य मोडतोड करून दाखवलं जातं. भाजपनं संविधानाला पेटवलं.त्या लोकांना अजून पकडलं नाही, असंही नाना पटोलेंनी म्हटलं. संविधान नको ही भाजपची भूमिका आहे.कांग्रेसनं संविधानाला ताकद दिली, असं नाना पटोले म्हणाले.
देशाच्या जनतेला गरीब करणं, गुलामीकडे नेणे, मनुस्मृती राबवणे हा भाजपचा प्रयत्न आहे.राहुल गांधींच्या बोलण्याबाबत चुकीचा नरेटिव्ह पसरवला जातोय असं नाना पटोले यांनी म्हटलं. राहुल गांधी सर्वांना घेऊन पुढे जात आहेत, असंही नाना पटोले यांनी सांगितलं.
इतर बातम्या :