(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ramtek : रामटेकच्या जागेवरुन मविआत घमासान? काँग्रेस नेते सुनील केदार, राजेंद्र मुळक पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या भेटीला
Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये अजूनही काँग्रेस आणि ठाकरे गटांमध्ये विदर्भातील जागांवरून घमासान सुरूच असल्याचे चित्र आहे.
Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) अजूनही काँग्रेस (Congress) आणि ठाकरे गटांमध्ये विदर्भातील जागांवरून घमासान सुरूच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अजून काही जागांवर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये तिढा कायम राहिला आहे. दरम्यान, विदर्भातील जागा संदर्भात सखोल चर्चा करण्यासाठी आज काँग्रेसचे विदर्भातील नेते सुनील केदार (Sunil Kedar) आणि राजेंद्र मुळक (Rajendra Mulak) पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्रीवर पोहोचले.
तिढा असलेल्या सगळ्या जागासंदर्भात सखोल चर्चा आणि त्या ठिकाणची स्थिती याबाबत सुनील केदार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. रामटेकची जागा काँग्रेसला शिवसेना ठाकरे गटाने द्यावी, यासाठी पुन्हा एकदा सुनील केदार यांच्याकडून प्रयत्न केला जातोय. तर शिवसेना ठाकरे गटाने पहिल्याच यादीत रामटेकच्या जागेवर विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना एबी फॉर्म सुद्धा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे रामटेकच्या जागेवर महाविकास आघाडीमध्ये नेमकं काय होणार? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
रामटेकच्या जागेवरुन मविआत पुन्हा घमासान?
रामटेकच्या जागे बद्दल पुन्हा एकदा सुनील केदार आणि राजेंद्र मुळक यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत चर्चा केलीय. शिवसेना ठाकरे गटाने पहिल्याच यादीत रामटेके जागेवर विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली आहे. तसेच त्यांना एबी फॉर्म सुद्धा दिला आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केलेल्या रामटेकच्या उमेदवारीबद्दल महाविकास आघाडीमध्ये फेर विचार केला जावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. याच मुद्यावरून आज सुनील केदार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये साधारणपणे एक अर्धा तास बैठक चालली. विदर्भातील ज्या काही मोजक्या जागांवर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये तिढा आहे.
या सगळ्या जागा संदर्भात सखोल चर्चा आणि त्या ठिकाणची स्थिती याबाबत सुनील केदार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे राजेंद्र मुळक रामटेक विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यामुळे रामटेकच्या उमेदवारी संदर्भात महाविकास आघाडीमध्ये पुनर्विचार होणार का? शिवाय इतर विदर्भातील जागांचा तिढा कधी सुटणार, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वेळ कमी असल्याने तिढा सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सकारात्मक चर्चा सुनील केदार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झाली असल्याची माहिती आहे.
महाविकास आघाडीत हाय व्होल्टेज ड्रामा
राजेंद्र मुळक हे राज्याचे माजी ऊर्जा व वित्त राज्यमंत्री आहेत. ते पृथ्वीराज चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू असून त्यांची इच्छा असलेल्या रामटेक मतदारसंघात अखेरच्या क्षणी चमत्कार होईल अशी अपेक्षा काँग्रेसच्या गोटात कायम आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल 85-85-85 असा सूत्र सांगत महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला असला तरी रामटेकसारख्या अनेक मतदारसंघांच्या माध्यमातून महाविकास आघाडीमधील हाय व्होल्टेज ड्रामा अजून शिल्लक असल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा