(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनणार नाहीत, योगी सरकारमधील मंत्र्याचा दावा
उत्तर प्रदेशातील योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्री असूनही ओमप्रकाश राजभर यांनी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात पूर्वांचलमध्ये तीन जागांवर विरोधी पक्षातील उमेदवारांना समर्थन दिलं आहे.
लखनौ : नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनणार नाहीत, असा दावा सुभासपा (सुहेलदेव भारतीय समाज पार्टी) पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी केला आहे. पुढील पंतप्रधान अनुसूचित जातीतील असेल, असा दावाही त्यांनी केला आहे.
मायावती या पंतप्रधान पदासाठीच्या प्रबळ दावेदार आहेत. मायावतींचं काम बोलतं आणि गरज पडल्यास मी त्यांना समर्थन देईन, असं राजभर यांनी म्हटलं आहे. मी एनडीए सोबतही नाही आणि महाआघाडीसोबतही नाही, असं हे सांगायलाही ते विसरले नाहीत. लोकसभा निवडणुकीत भाजप पराभूत झाला तरी मला फरक पडणार नाही. यावेळी 119 खासदार अनुसूचित जातीतील असतील. त्यामुळे कमी जागा असूनही मायावतींचा कुणीही विरोध करु शकणार नाहीत.
उत्तर प्रदेशातील योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्री असूनही ओमप्रकाश राजभर यांनी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात पूर्वांचलमध्ये तीन जागांवर विरोधी पक्षातील उमेदवारांना समर्थन दिलं आहे. लोकसभा निवडणुकीत तिकीट वाटपावरुन भाजपवर नाराज असलेल्या राजभर यांनी मिर्झापूरमध्ये काँग्रेस तर महाराजगंज आणि बासगावमध्ये महाआघाडीच्या उमेदवारांना समर्थन दिलं आहे.
मिर्झापूर, महाराजगंज आणि बासगावमध्ये सुभासपाच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द केल्याने असा निर्णय घेतल्याचं पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण राजभर यांनी सांगितलं. कार्यकर्त्यांसोबत चर्चा केल्यानंतर काँग्रेस आणि महाआघाडीच्या उमेदवारांना समर्थन देण्याचा निर्णय घेण्यात आला. मिर्झापूर, महाराजगंज आणि बासगाव या तीनही जागांवर आम्ही भाजपच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करु, असं अरुण राजभर यांनी सांगितलं.