लोकसभा निवडणूक 2019 : देशभरात हजारो कोटींचा मुद्देमाल जप्त, निवडणूक आयोगाची कारवाई
महाराष्ट्रात 42 कोटींची रोकड आतापर्यंत निवडणूक यंत्रणांनी जप्त केली आहे. तर 21.51 कोटींची दारु, सहा कोटींचे अमली पदार्थ असा एकूण 115.46 कोटींची ऐवज निवडणूक आयोगाने जप्त केला आहे.
मुंबई : निवडणुकीत पैशांची उधळण कशाप्रकारे केली जाते, याचा अंदाज निवडणुकीदरम्यान जप्त केलेल्या रोकड, दारुसाठा, अमली पदार्थ यावरुन लावता येईल. निवडणूक काळात देशभरात हजारो कोटी रुपयांचा दारुसाठा, रोकड, अमली पदार्थ जप्तीची कारवाई निवडणूक आयोग आणि संबधित यंत्रणांनी केली आहे. जवळपास 2628.43 कोटींचा मुद्देमाल कारवाईत जप्त करण्यात आला होता. तामिळनाडूमध्ये सर्वाधिक 209 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात 42 कोटींची रोकड आतापर्यंत निवडणूक यंत्रणांनी जप्त केली आहे. तर 21.51 कोटींची दारु, सहा कोटींचे अमली पदार्थ असा एकूण 115.46 कोटींची ऐवज निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात जप्त केला आहे.
गुजरात गुजरातमध्ये सर्वाधित 543.84 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 7.7 कोटींची रोकड, 10 कोटींहून अधिकची दारु, 524 कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
तेलंगणा तेलंगणामध्ये 68.82 कोटींची रोकड, 5 कोटींची दारु, जवळपास 3 कोटींचे अमली पदार्थ असा एकूण 514.57 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिल्ली दिल्लीमध्ये 32.7 कोटींची रोख रक्कम, जवळपास अडीच कोटींची दारु, 348 कोटींचे अमली पदार्थ असा एकूण 390 कोटींचा ऐवज निवडणूक आयोगाने जप्त केला आहे.
आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशात 137 कोटींची रोकड, 26 कोटींची दारु, 34 कोटींच्या सोन्या-चांदीच्या वस्तू असा एकूण 216.34 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पंजाब पंजाबमध्ये 22.54 कोटींची रोख रक्कम, साडेसात कोटींची दारु, 160 कोटींचे अमली पदार्थ असा एकूण 209 कोटींचा मुद्देमाल निवडणूक आयोगाने जप्त केला आहे.
देशभरातील जप्त केलेल्या मुद्देमालाची आकडेवारी डोळे पांढरे करणारी आहे. देशभरात 694 कोटींची रोकड, 218 कोटींची दारु, 1151 कोटींचे अमली पदार्थ, 512 कोटींच्या सोन्या-चांदीच्या वस्तू आणि 51 कोटींच्या इतर वस्तू असा एकूण 2628.43 कोटींची मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.