Dindori Lok Sabha Election Result 2024 : दिंडोरी लोकसभेत मोठा ट्विस्ट, भगरे आडनावाच्या अपक्ष उमेदवाराला चक्क 12 हजार मते
Dindori Lok Sabha Election Result 2024 : दिंडोरीत महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे हे चौथ्या फेरी अखेर 6 हजार 989 मतांनी आघाडीवर आहेत. मात्र भगरे नावाच्या अपक्ष उमेदवाराला 12, 389 मते मिळाली आहेत.
Dindori Lok Sabha Election Result 2024 : गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result 2024) मंगळवारी जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. येत्या काही तासात देशात कुणाची सत्ता येणार? याचे चित्र स्पष्ट होणार आहे. तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांच्यात प्रमुख लढत होत आहे. मात्र भास्कर भगरे यांच्या नावात साम्य असलेल्या उमेदवाराला तब्बल 12 हजार मते मिळाली आहेत. यामुळे भास्कर भगरेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बाबू सदू भगरे सरांना चक्क 12 हजार 389 मते
दिंडोरीत महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे हे चौथ्या फेरी अखेर 6 हजार 989 मतांनी आघाडीवर आहेत. मात्र आडनावात साम्य असलेले उमेदवार बाबू सदू भगरे सरांना चक्क 12389 मते मिळाली आहेत. दिंडोरीत एकच आडनाव आसलेल्या उमेदवारामुळे नाट्यमय वळण मिळण्याची शक्यता आहे. निकलाअंती महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांना फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निकालाआधीच भास्कर भगरे यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव
दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यावर निकालाआधीच शुभेच्छांचा वर्षाव सुरू झालाय. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये भास्कर भगरे काही प्रमाणात आघाडीवर दिसत असल्याने समर्थक भगरे यांना पुष्पगुच्छ, शाल देऊन आनंदोत्सव साजरा करत आहेत. तर भास्कर भगरेही आत्मविश्वासाने विजयाचे चिन्ह दाखवून शुभेच्छांचा स्वीकार करून प्रतिसाद देत आहेत. जनतेनेच निवडणूक हातात घेतली आहे, त्यामुळे आपलाच विजय असल्याचा विश्वास भास्कर भगरे यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला.
एक लाख मताधिक्याने आपला विजय होणार : भारती पवार
एकीकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी विजयाचा दावा केला असतानाच दुसरीकडे महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांनीही स्वतःच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला आहे. काही मतदान केंद्रावर आपल्यालाही आघाडी मिळाली आहे. त्यामुळे निकालाअंती एक लाख मताधिक्याने आपला विजय होणार असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केलाय. सर्वच विधानसभा मतदारसंघातून आपल्याला चांगले मतदान झाले. पंतप्रधान मोदींच्या कारकिर्दीत झालेल्या विकासाला मतदारांनी पसंती दिली आहे. कांद्याच्या प्रश्नांवर संघर्ष करावा लागला नाही. मात्र आम्ही त्यावर उपाय शोधल्याचा दावा भारती पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला आहे.
आणखी वाचा