Lok Sabha Election Result : मोजकंच बोलले, पत्रकारपरिषदही थोडक्यात आटोपली, पण खरगे नव्याने सोबत येणाऱ्या मित्रांबद्दल बोलून गेले, चर्चांना उधाण
Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं पत्रकार परिषद घेतली. यावेळी मल्लिकार्जून खरगे आणि राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी (Lok Sabha Election Counting) अद्याप सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालात (Lok Sabha Election Result) स्वबळावर सत्ता मिळवण्याचं भाजपचं स्वप्न भंगलं आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं पत्रकार परिषद घेतली. मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. काँग्रेसनं 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरी पेक्षा चांगलं प्रदर्शन यावेळी केलं आहे. मल्लिकार्जून खरगे यांनी ही निवडणूक मोदी विरुद्ध जनता अशी झाल्याचं म्हटलं. हा निकाल जनतेचा निकाल आहे. हा जनतेचा विजय असून लोकशाहीचा विजय असल्याचं मल्लिकार्जून खरगे यांनी म्हटलं.
ही निवडणूक जनता विरुद्ध मोदी अशी आहे, असं आम्ही सांगत आलेलो आहे. आम्ही विनम्रपणे निवडणुकीचा कौल स्वीकारत आहोत. जनतेनं यावेळी एका कुणालाही बहुमत दिलं नाही. हा जनादेश नरेंद्र मोदींच्या विरोधात गेल्याचं खरगे म्हणाले. आपल्या नावानं जो व्यक्ती मतं मागत होता, त्यांचा हा मोठा पराभव आहे, असं खरगे म्हणाले.
काँग्रेस पार्टी आणि इंडिया आघाडीनं प्रतिकूल परिस्थितीत निवडणूक लढवली. सरकारी यंत्रणांनी बँक खाती सील करण्यासारखे प्रकार केले. काँग्रेसनं सकारात्मक प्रचार केला. आम्ही बेरोजगारी, महागाई,मजुरांची वाईट स्थिती यावर आम्ही आवाज उठवला. आम्हाला लोकं जोडले गेले, असं मल्लिकार्जून खरगे म्हणाले. पाच न्याय घेऊन आम्ही लोकांपर्यंत गेलो, असं मल्लिकार्जून खरगे म्हणाले.
भाजपनं सर्व संविधानिक संस्थांवर बेकायदेशीर पद्धतीनं कब्जा मिळवला. काही जणांवर दाबव आणला गेला. जे दबावात आले नाहीत त्यांचे पक्ष तोडण्यात आले, असं मल्लिकार्जून खरगे म्हणाले.
इंडिया आघाडीतील सर्व मित्र पक्षांचे आभार मानतो, असं मल्लिकार्जून खरगे म्हणाले. हजारो आणि लाखो कार्यकर्त्यांनी योग्य समन्वय साधत काम केलं असं खरगे यांनी म्हटलं. संविधानाच्या संरक्षणासाठी, सीमांच्या संरक्षणासाठी लढत राहणार आहोत. संसद योग्य पद्धतीनं चालवली जावी, विरोधी पक्षांच्या मुद्यांवर चर्चा झाली पाहिजे यासाठी आम्ही दक्ष राहू असं खरगे म्हणाले.
नवे मित्र....
जोपर्यंत आम्ही आमच्या मित्रपक्षांसोबत बोलत नाही आणि नव्यानं जोडल्या जाणाऱ्या मित्रपक्षांसोबत चर्चा करुन कशा प्रकारे बहुमत बनवता येईल याचा विचार करत आहोत. सर्व गोष्टी इथंच सांगितल्या तर मोदी हुशार आहेत, असं मल्लिकार्जून खरगे म्हणाले.
दरम्यान, राहुल गांधी यांनी देशातील गरिबांनी संविधानाला वाचवलं असल्याचं म्हटलं. देशातल्या गरिबांनी या संविधानाला वाचवलं, आम्ही त्यांच्यासोबत उभे आहोत, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.
संबंधित बातम्या :