सदा सरवणकरांवर कोळीवाड्यातील लाडकी बहीण संतापली; दारातूनच परत पाठवलं, चांगलंच सुनावलं
माहीम विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना शिवसेना ठाकरे गटाच्या महेश सावंत आणि मनसेच्या अमित ठाकरे यांचं आव्हान आहे.
मुंबई : राजधानी मुंबईतील सर्वात हायव्होल्टेज लढत म्हणजे माहीम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना विरुद्ध शिवसेना विरुद्ध मनसे. कारण, या मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit thackeray) मैदानात आहेत. त्यामुळे, येथील मतदारसंघातील चूरस चांगलीच वाढली आहे. त्यातच, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांना येथून अर्ज माघारी घेण्यासाठी मोठा दबाव टाकण्यात आला होता. महायुतीमधील दिग्गज नेत्यांसोबत त्यांची याबाबत बैठकही झाली. मात्र, त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवत राजपुत्राला आव्हान दिलं आहे. आता, निवडणुकांच्या प्रचारासाठी मतदारसंघात फिरत असताना सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांना लाडक्या बहिणीच्या संतापाचा सामना करावा लागला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून व्हिडिओत लाडकी बहीण चांगलीच संतापल्याचं पाहायला मिळत आहे.
माहीम विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना शिवसेना ठाकरे गटाच्या महेश सावंत आणि मनसेच्या अमित ठाकरे यांचं आव्हान आहे. त्यामुळे, प्रचारफेरी व गाठीभेटीच्या माध्यमातून नेतेमंडळी सध्या मतदारसंघात पायाला भिंगरी लावून फिरत आहे. आमदार सदा सरवणकर हेही आपल्या कार्यकर्त्यांसह माहीम कोळीवाड्यात गेले असता त्यांना तेथील महिला भगिनींच्या रोषाचा सामना करावा लागला. माहीम कोळीवाडा येथे राहणाऱ्या स्थानिक कोळी महिलांनी सदा सरवणकर यांना जाब विचारत घरात येऊ दिले नाहीत, याउलट त्यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांना परत पाठवले. यावेळी, प्रश्नांची सरबत्ती सदा सरवणकरांवर करण्यात आली. कोळीवाड येथील फिश फूड स्टॉल विद्यमान आमदारांकडून हटवल्याने कोळी बहिणींकडून सदा सरवणकर यांना जाब विचारण्यात आला. यावेळी, सदा सरवणकरांना लाडकी बहीण म्हणत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोळीवाड्यातली लाडकी बहीण चांगलीच संतापल्याचं दिसून आलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, माहीम विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे यांनी रविवारी पुत्र अमित यांच्यासाठी सभा घेतली. यावेळी, अमित यांच्या विरोधातील उमेदवारांना टीका करणार नसल्याचे म्हणत त्यांच्या इतिहासाची आठवण माहीमकरांना करुन दिली. काँग्रेसमधून हे शिवसेनेत आल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलं. दरम्यान, माहीम विधानसभा मतदारसंघात सदा सरवणकर यांच्यावर सध्या मनसेच्या (MNS) नेत्यांकडून चौफेर टीका सुरू आहे.
अमितसाठी तुम्हाला अपॉईंटमेंटची गरज नसेल
आज अमित ठाकरेंच्या विरोधात जी माणसे उभी आहेत, त्यांची सगळी अंडीपिल्ली बाहेर काढू शकतो, मात्र त्या घाणीत मला हात घालायचा नाही, असं राज ठाकरेंनी सांगितले. तुमच्या हाकेला 24 तास ओ देणारी माणसे हवीत. अमित राज ठाकरे असे जरी नाव असले तरी तुम्हाला त्याला भेटण्यासाठी अपॉईंटमेंटची गरज लागणार नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.
हेही वाचा
मीही निवृत्त होणार पण..; शरद पवारांचे नाव घेऊन अजित पवारांनी दिले संकेत, वारसदाराबद्दल काय म्हणाले?