Ajit Pawar NCP in BMC Election: अजित पवारांकडून पुण्यात गुंडांच्या टोळ्यात तिकिट वाटप; मुंबईतही एकनाथ शिंदेपेक्षा वरचढ ठरले! किती जागांवर उमेदवार रिंगणात?
मुंबई मनपासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जवळपास 96 उमेदवार उतरवण्यात आले आहेत. शिंदे सेनेकडून 90 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Ajit Pawar NCP in BMC Election: गुन्हेगारांना सोडणार नाही, टायरमध्ये घाला, अमुक ठिकाणी घाला, तमुक ठिकाणी घाला अशा जाहीर वल्गना करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये मात्र महापालिका निवडणुकीमध्ये आपली सर्व तत्त्व बाजूला ठेवून चक्क गुंडांच्या टोळ्यांमध्ये तिकीट वाटप केलं आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये जेलमध्ये असलेल्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांना महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग 23 मधून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता या दोघीसुद्धा जेलमधून निवडणूक लढवणार आहेत. दुसरीकडे गजा मारणेच्या बायकोला सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही घराण्यांचा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा इतिहास असतानाही अजित पवारांनी सढळ हाताने उमेदवारी दिल्याने पुण्यातील गुन्हेगारीमुक्तीची स्वप्ने पाहणाऱ्या 'पालकमंत्री' अजित पवारांना आता या उमेदवारी कशा चालतात? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मुंबईमध्ये शिंदेंपेक्षा दादांचे अधिक उमेदवार
दुसरीकडे पुण्यामध्ये अजित पवारांनी गुन्हेगारांमध्ये हात सैल सोडला असतानाच मुंबईमध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा अधिक उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. मुंबई मनपासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जवळपास 96 उमेदवार उतरवण्यात आले आहेत. शिंदे सेनेकडून 90 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून 11 उत्तर भारतीय, मराठी 56, मुस्लिम 23, ख्रिश्चन तीन, तेलगू एक, तमिळ एक आणि बोहरा मुस्लिम एक समीकरण आहे. पक्षाकडून 50 महिला उमेदवारांना तर 46 पुरुष उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. एससी प्रवर्गातून 12 उमेदवार आहेत, तर ओबीसी मधून 17 उमेदवार आहेत.
मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे सर्वाधिक उमेदवार
दुसरीकडे शिवसेना ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीचा सुद्धा फॉर्म्युला समोर आला आहे. मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे 163 जागांवर रिंगणामध्ये आहे. मनसेला 53 जागा देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पक्षाला 11 जागा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये ठाकरे शिवेसेनेचे उमेदवार सर्वाधिक असल्याचे चित्र आहे.
इतर महत्वाच्या बातम्या





















