Gujarat Assembly Election 2022 : बिगुल वाजलं, निवडणूक कार्यक्रम जाहीर; गुजरात निवडणुकीत कोणते मुद्दे गाजणार?
Gujarat Assembly Election 2022 : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा. गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणूक होणार असून 1 आणि 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर मतमोजणी 8 डिसेंबरला
Gujarat Assembly Election 2022 : गुजरातच्या रणधुमाळीला (Gujrat Elections) आजपासून सुरुवात झाली आहे. गुजरातमध्ये मतदान दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यांत 89 जागांवर मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यांत 93 जागांसाठी मतदान (Voting) पार पडणार आहे. 1 आणि 5 डिसेंबर रोजी गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजेच, 8 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. दरम्यान, भाजपसाठी दोन्ही विधानसभा निवडणुका प्रतिष्ठेच्या आहेत. तर गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षानं एन्ट्री घेतली असून सत्ता काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे.
तब्बल 25 वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. 2017 मधील आकडे पाहता भाजपनं बहुमत मिळवलं असलं तरीदेखील काँग्रेस आणि भाजपच्या जागांमध्ये मात्र 19 जागांचा फरक होता. तसेच, यंदा गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी आपनं देखील कंबर कसली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे. तर भाजपसमोर सत्ता टिकवण्याचं आव्हान असणार आहे.
भाजपकडे कोणते मुद्दे?
गेल्या 25 वर्षांपासून गुजरातमध्ये सत्तेत असणाऱ्या भाजपसमोर यंदा मात्र सत्ता टिकवण्याचं आव्हान आहे. त्यासाठी भाजपनं कंबर कसली असून निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. यंदा गुजरातमध्ये प्रचारासाठी भाजप बड्या नेत्यांची फौज उतरवणार आहे. भाजपकडून स्वतः पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह प्रचार करताना दिसतील. तर आपकडून अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसकडून प्रियंका गांधींकडून प्रचारसभांचा धुरळा उडवण्याची शक्यता आहे.
विकास, राष्ट्रीय सुरक्षा, सर्वसामान्यांच्या सोयीसुविधा, गरीब आणि शेतकरी बळकट करण्याच्या मुद्द्यावर भाजपनं निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या विकासकामांची मोजदाद सर्वत्र होत आहे. गुजरातमध्ये AIIMS, IIT सारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थांची स्थापना करणार असल्याचं बोललं जात आहे. त्याचप्रमाणे महामार्ग, पूल, अंडर ब्रिज, बोगदा, मेट्रो यांसारख्या सोयीसुविधांची आश्वासनं भाजपकडून दिली जाऊ शकतात.
गुजरात निवडणुकीत हे मुद्देही गाजणार?
- मोदींचं विकास मॉडेल
- धार्मिक ध्रुवीकरण
- डबल इंजिन सरकार
- 27 वर्षांची अँटी इन्कबन्सी
- काँग्रेससमोर नेतृत्वाचं आव्हानं
- अरविंद केजरीवाल यांचा वाढता प्रभाव
- वाढती महागाई
- बेरोजगारी
- लम्पीचा प्रादुर्भाव
निवडणुकीत विरोधकांचे प्रमुख मुद्दे
1. कोरोनाचा प्रादुर्भाव : कोरोना काळात आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा उडाल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. कोरोना काळात झालेल्या मृतांचा आकडा लपवण्यात आल्याचा आरोपही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर केला होता.
1. शेतकरी : केंद्र सरकारनं कृषी कायदा मागे घेतल्यानंतरही विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला घेरलं आहे. गुजरातमध्येही सध्या शेतकऱ्यांचे विषय चर्चेत आहे. विरोधकांकडून या मुद्द्यावरुन सातत्यानं सरकारला लक्ष्य केलं जात आहे. भाजप सरकार शेतकर्यांचे नाही, तर उद्योगपतींचे कर्ज माफ करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
2. बेरोजगारी : निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधकांकडूनही बेरोजगारीचा मुद्दा सातत्यानं उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे. तरुणांमध्ये रोजगाराच्या कमी संधींमुळे असंतोष असल्याची चर्चा गुजरातमध्येही सातत्यानं होत आहे. निवडणुकीच्या काळात भरती परीक्षांना होणारा विलंब हा मुद्दाही यंदाच्या निवडणुकीत गाजू शकतो.
3. महागाई : सध्या संपूर्ण जगावर मंदीचं सावट आहे. तसेच, राष्ट्रीय स्तरावर महागाईचा मुद्दा गाजत आहे. याचाच परिणाम गुजरातच्या निवडणुकीतही दिसून येईल. आतापासून विरोधी पक्षांचे नेते महागाईवरून सरकारला घेरण्यात व्यस्त आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर, भाजीपाला आणि खाद्यपदार्थांची महागाई याबाबतही सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :