(Source: Poll of Polls)
Pramod Sawant on Exit Poll: एक्झिट पोल काहीही दाखवू शकतात, गोव्यात पुन्हा आम्हीच सत्तेत येणार : प्रमोद सावंत
गोव्यात भाजप आणि काँग्रेस यांच्यात जोरदार सामना रंगल्याचे चित्र एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. दोन्ही पक्षांमध्ये मोठी स्पर्धा. गोव्यात भाजप पुन्हा सत्तेत येणार असल्याचा दावा प्रमोद सावंत यांनी केलाय.

Pramod Sawant on Exit Poll : उद्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. मतदारांनी कोणाच्या पारड्यात जनमताचा कौल दिला ते स्पष्ट होणार आहे. दरम्यान, गोव्यात भाजप आणि काँग्रेस यांच्यात जोरदार सामना रंगल्याचे चित्र एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. दोघांमध्ये मोठी स्पर्धा असून, भाजप सत्ता कायम रखणार की, काँग्रेस सत्तेत येणार हे सांगता येत नाही. या एक्झिट पोलबाबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वक्तव्य केलं आहे. एक्झिट पोल काहीही दाखवू शकतात, हे एक्झिट पोल खोटे असल्याचे सावंत म्हणालेत.
आम्हाला पूर्ण विश्वास आहे की गोव्यात भाजप पुन्हा बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. 10 मार्चला निकाल भाजपच्या बाजूने येईल असा विश्वास यावेळी सावंत यांनी व्यक्त केला आहे. यावेळी भाजपची काँग्रेसशी थेट स्पर्धा आहे. काँग्रेसच्या मनात नेहमीच भीती असते. यावेळी त्यांनी ज्याप्रकारचे उमेदवार निवडले आहेत, ते पाहता कुठेतरी त्यांना असे वाटले असेल की, ते पुन्हा पळून जाऊ नये असा टोलाही सावंत यांनी लगावला. काँग्रेसने सध्या रिसॉर्ट राजकारण सुरु केल्याचे सावंत म्हणाले.
दरम्यान, याआधी प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली होती. याबाबत त्यांनी ट्विटही केले आहे. ज्यामध्ये सावंत म्हणाले की, गोव्यात भाजपच्या दमदार कामगिरीची माहिती पंतप्रधान मोदींना देण्यात आली आहे. त्यामुळे जनतेच्या आशीर्वादाने गोव्यात पुन्हा सरकार स्थापन करण्याची संधी मिळेल. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही लोकांच्या हितासाठी काम करत राहू असेही सावंत यांनी सांगितले.
एक्झिट पोलचे निकाल काय ?
एक्झिट पोलबद्दल बोलायचे झाले तर गोव्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये निकराची लढत आहे. एबीपी, सी-व्होटरच्या एक्झिट पोलमध्ये गोव्यातील 40 जागांपैकी भाजपला 13 ते 17 जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला 12 ते 16 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. निवडणुकीचे निकाल असेच राहिले तर तृणमूल काँग्रेस गोव्यात किंगमेकर ठरु शकते. कारण एक्झिट पोलमध्ये टीएमसीला 5 ते 9 जागा मिळतील असे दाखवण्यात आले आहे. तर इतरांना 2 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे गोव्यात पुन्हा भाजपच सत्ता काबीज करणार की काँग्रेस हे आता 10 मार्चच्या निकालानंतरच कळणार आहे.
दरम्यान, एक्झिट पोलचे आकडे आल्यानंतर गोव्यात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसनं हालचाली सुरु केल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या प्रमुखांमध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. 2017 सालाप्रमाणे यावेळी गाफील न राहण्याचं काँग्रेसनं ठरवल्याचं दिसतंय. काँग्रेस नेते गोव्यातल्या स्थानिक पक्षांच्या संपर्कात असल्याचं समोर आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या:















