ईव्हीएमबाबत चुकीची माहिती पसरवल्यास कारवाई होणार, निवडणूक आयोगाचे आदेश
फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप या सोशल मीडियाच्या माध्यमातून ईव्हीएमबाबत अफवा पसरवणे हे चुकीचे आहे. असं कृत्य करताना कुणी आढळल्यास निवडणूक आयोग कारवाई करणार आहे.

मुंबई : ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत सोशल मीडियावरुन अफवा किंवा चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिले आहेत. सोशल मीडिया निवडणूक अधिकारी यांनी या संदर्भात राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्यासाठी परिपत्रक काढलं आहे.
फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप या सोशल मीडियाच्या माध्यमातून ईव्हीएमबाबत अफवा पसरवणे हे चुकीचे आहे. असं कृत्य करताना कुणी आढळल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याचे निर्देश सोशल मीडिया निवडणूक अधिकारी डॉ. बाळसिंग राजपूत यांनी दिले आहेत.

त्यानुसार आचारसंहितेशी संबंधित सोशल मीडियाच्या माध्यमातून देखरेख करताना एखादी आक्षेपार्ह पोस्ट, फोटो किंवा व्हिडीओ आढळल्यास किंवा त्याबाबतची तक्रार मिळाल्यास कारवाई केली जाईल, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमवरुन मोठा वाद निर्माण झाला होता. अनेक राजकीय पक्षांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत आक्षेप घेतले होते. विरोधी पक्षांनी तर ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी अशी मागणीही केली होती. त्यामुळे ईव्हीएमबाबत नकारात्मक प्रचार सोशल मीडियावर दिसून येत होता. या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये ईव्हीएमबाबत चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने खबरदारी घेतली आहे.




















