(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शहीद हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंहला निवडणूक आयोगाची नोटीस
भोपाळमधील एका कार्यक्रमात प्रज्ञा सिंहने शहीत हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर निवडणूक आयोगाने या कार्यक्रमाचे आयोजक आणि साध्वीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
भोपाळ : मुंबई हल्ल्यामधील शहीद हेमंत करकरे यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरच्या अडचणी वाढल्या आहेत. निवडणूक आयोगाने प्रज्ञा सिंह ठाकूरला नोटीस बजावली आहे.
भोपाळमधील एका कार्यक्रमात प्रज्ञा सिंहने शहीत हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर निवडणूक आयोगाने या कार्यक्रमाचे आयोजक आणि साध्वीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. येत्या 24 तासात याबद्दल स्पष्टीकरण मागवलं आहे. तसेच प्रज्ञा सिंहचं वक्तव्य आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याचंही निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.
हेमंत करकरेंबद्दलच्या 'त्या' वक्तव्यावर साध्वी प्रज्ञा सिंहचा माफीनामा
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला दिवंगत एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या संतापजनक वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. 'हेमंत करकरेंना मी शाप दिला होता, म्हणून त्यांचा दहशतवादी हल्ल्यात सर्वनाश झाला', असं वादग्रस्त विधान गुरुवारी भोपाळमध्ये एका कार्यक्रमात बोलताना साध्वी प्रज्ञाने केलं होतं.
साध्वीच्या या वक्तव्यावर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आल्यानंतर साध्वीने माफी मागितली आहे. "माझ्या वक्तव्याचा देशाचा शत्रूंना फायदा होतोय असं मला वाटत आहे. त्यामुळे मी माझे वक्तव्य मागे घेऊन माफी मागते", असं साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने म्हटले आहे.
भोपाळमधून काँग्रेसच्या दिग्विजय सिंह यांच्याविरोधात भाजपकडून साध्वी प्रज्ञा सिंहला उमेदवारी
भाजपने मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदार संघातून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे याठिकाणी काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह विरुद्ध साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर असा सामना पाहायला मिळणार आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरने बुधवारी भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर लगेच उमेदवारी जाहीर झाली आहे.
मायावती आणि योगींवर निवडणूक आयोगाची कारवाई
आचारसंहितेचं उल्लंघन करत धर्माच्या नावावर मतं मागितल्याप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बसपा प्रमुख मायावती यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली होती. योगी आदित्यनाथ यांच्यावर 16, 17, 18 एप्रिलला आणि मायावती 16, 17 एप्रिलला निवडणूक प्रचार न करण्याची कारवाई निवडणूक आयोगाने केली होती.