कोल्हापुरात महायुतीचं जागावाटपाचं घोडं अजूनही अडलं; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिसऱ्या आघाडीशी घरोबा
कोल्हापुरात वंचित बहुजन आघाडी आणि आप सर्व जागांवर तिसरी आघाडीच्या माध्यमातून उमेदवार देणार आहेत. काल दोन्ही पक्षांनी संयुक्त परिषदेत आघाडीची घोषणा केली.

Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापुरात काँग्रेसकडून 48 जणांची उमेदवारी जाहीर करून आघाडी घेण्यात आली असली, तरी अजूनही महायुतीमध्ये जागा वाटपावरून संघर्ष सुरूच आहे. अजून पर्यंत कोणत्याही फॉर्मुल्यावर अंतिम शिकामोर्तब झालं नसल्याने चर्चेचं गुऱ्हाळ अजूनही सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून पहिला उमेदवारी अर्ज आज (27 डिसेंबर) दाखल केला जाणार आहे. भाजप खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक प्रभाग क्रमांक तीनमधून आज शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. गेल्या चार दिवसांपासून कृष्णराज महाडिक महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा होती. त्यांची उमेदवारी निश्चित झाली असल्याचं आता स्पष्ट झाला आहे. दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांमध्ये अजूनही बैठकांचा फेऱ्यांवर फेरा सुरूच आहे. महायुतीमध्ये 36- 30-15 असा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. कृष्णराज महाडिक यांनी मुंबईमध्ये भाजप नेतृत्वाच्या भेटीगाठी केल्यानंतर निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब झालं होतं. ते म्हणाले, राजकारणात उतरण्याची पहिली पायरी महानगरपालिका आहे. वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार मी महापालिकेच्या रिंगणात उतरणार आहे. नगरसेवक झाल्याशिवाय शहराच्या समस्या कळत नाहीत. त्यामुळे प्रभाग क्रमांक तीनमधून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी म्हटलं होतं.
महायुतीत जागावाटपावरून अडलं
मात्र, शिवसेना भाजप व कोणत्याही परिस्थितीत कमी जागा घेण्यासाठी तयार नसल्याने गोची झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला सर्वात कमी जागा येत असल्याने सुद्धा भलतीच अडचण झाली आहे. त्यामुळे आता फॉर्म्युला निश्चित होणार याकडे लक्ष असेल. दुसरीकडे जनसुराज्य पक्ष सुद्धा महायुतीचा घटक पक्ष आहे. मात्र, आता जनसुराज्यचा विषय भाजपच्या गळ्यात घातल्याची सुद्धा चर्चा आहे. त्यामुळे आता जनसुराज्यला काही जागा द्यायच्या असतील, तर भाजप आपल्या पदरात अधिक जागा पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे.
तिसऱ्या आघाडीत शरद पवारांची राष्ट्रवादी
दरम्यान, कोल्हापुरात वंचित बहुजन आघाडी आणि आप सर्व जागांवर तिसरी आघाडीच्या माध्यमातून उमेदवार देणार आहेत. काल दोन्ही पक्षांनी संयुक्त परिषदेत आघाडीची घोषणा केली. महाविकास आघाडीत जागावाटपात सन्मानजनक जागा मिळत नसल्याने शरद पवारांची राष्ट्रवादी तिसऱ्या आघाडीशी चर्चा करत आहे. काल आम आदमी पार्टी व वंचित बहुजन आघाडीबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीला वंचित महानगराध्यक्ष अरुण सोनवणे व आपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांच्याबरोबर राष्ट्रवादीकडून 81 जागेबाबत चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी आमदार विनय कोरे यांच्याशी सुद्धा संपर्क साधला आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पोवार, प्रदेश निरीक्षक व राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे, कार्याध्यक्ष अनिल घाटगे हजर होते.
इतर महत्वाच्या बातम्या





















