Dhananjay Munde: मराठा-ओबीसी संघर्षामुळे परळीत पराभव होण्याची भीती वाटते का? धनंजय मुंडे म्हणाले...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: परळी विधानसभेचा निकाल बीडसारखा लागेल, याची भीती वाटते का? धनंजय मुंडे म्हणाले...
बीड: परळी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी गुरुवारी निवडणुकीसाठीचा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. धनंजय मुंडे यांनी कुठलेही शक्तीप्रदर्शन न करता उमेदवारी अर्ज भरणे पसंत केले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तुम्हाला बीड लोकसभेप्रमाणे परळी विधानसभेचा (Parli Vidha Sabha) निकाल लागेल, अशी भीती वाटते का, असा प्रश्न धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना विचारण्यात आला. तेव्हा धनंजय मुंडे यांनी ही शक्यता सपशेल फेटाळून लावली.
धनंजय मुंडे यांनी आपल्याला बीड लोकसभेप्रमाणे निकाल लागण्याची कोणतीही भीती वाटत नसल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, आज जवळजवळ 70 ते 72 गावांमध्ये मी चर्चा केली. लोकसभेला ज्या पद्धतीचं वातावरण होतं, तसं कुठेही दिसलं नाही, हे मी खात्रीने सांगतो. मला मत द्यावं की नाही, हा लोकशाहीत जनतेचा अधिकार आहे. पण महाराष्ट्रातील प्रत्येक गावात जो सामाजिक सलोखा मागच्या काळात बिघडलाय. ज्या लहान मुलाला वाचता येत नाही, तो जातीवर भांडतोय. हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारं नाही. निवडणुका येतील-जातील, जय-पराजय हा सगळा विषय होईल, कुठला पक्ष सत्तेत यायचा तो येईल, पण सामाजिक सलोखा निर्माण झाला पाहिजे, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले.
प्रत्येकाला प्रारब्ध भोगावा लागतं: धनंजय मुंडे
लोकसभा निवडणुकीपूर्वी बिघडलेला सामाजिक सलोखा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी गावातील लोकांना एकत्र बसलं पाहिजे, कोणाला मतं द्यायचं हे ठरवायचं, त्यातूनच सामाजिक सलोखा पूर्ववत होईल, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले. परळी माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे.लोकसभा निवडणुकीत परळीतील जनतेने 75 हजारांचं मताधिक्य दिलं. या प्रेमातून आम्ही उतराई होऊ शकत नाही. त्यांचे प्रश्न सोडवणे हाच या प्रेमातून उतराई होण्याचा मार्ग आहे, असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.
प्रत्येकाला आपल्या जीवनातील प्रारब्ध भोगावा लागतो. तो का येतो, त्याची कारणं काय असतात, हे महत्त्वाचं नसतं. पण प्रारब्ध हा देवाला चुकला नाही तर आपल्याला चुकू शकत नाही. पण ज्यावेळेस जनमानसाची भावना कुठेतरी आम्ही एकत्र यावं, ती भावना नियती ऐकते. मग नियती कशातरी पद्धतीने आम्हाला राजकीयदृष्ट्या एकत्र आणले. आमच्या मनात होते ते नियतीने घडवून आणले.
पाच लाडक्या बहिणींच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज
धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला. बीडच्या परळी तहसील कार्यालयामध्ये भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यासोबत धनंजय मुंडे यांनी विधानसभेकरिता उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पाच लाडक्या बहिणींसोबत धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
आणखी वाचा