Goa Election 2022 : आदित्य ठाकरेंना इतिहास माहित नाही तर संजय राऊतांच्या बोलण्यानं आमचं मनोरंजन होतं : देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis in Goa Election 2022 :भाजपला गोव्यात जनतेचा प्रतिसाद मिळतोय का? भाजपसमोर नेमकी आव्हानं काय आहेत. यासंदर्भात एबीपी माझाने देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
Devendra Fadnavis in Goa Election 2022 : आदित्य ठाकरेंना इतिहास माहित नाही तर संजय राऊतांच्या बोलण्यानं आमचं मनोरंजन होतं, असं विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे. सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील अनेक नेते गोव्यात प्रचारासाठी तळ ठोकून बसले आहेत. यातीलच एक नेते म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस. फडणवीस हे सध्या गोव्यात प्रचार करत असून, गोव्यात भाजपची नेमकी स्थिती काय? भाजपला गोव्यात जनतेचा प्रतिसाद मिळतोय का? भाजपसमोर नेमकी आव्हानं काय आहेत. यासंदर्भात एबीपी माझाने देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
एकदाही उमेदवाराचे डिपॉजिट वाचूव शकले नाहीत
आदित्य ठाकरे यांनी केलेल्या गोव्यात भाजपमुळे शिवसेना वाढू शकली नाही या आरोपावर बोलताना फडणवीस म्हणाले की, आदित्य ठाकरेंना इतिहासच माहित नाही. पूर्ण ताकतीने शिवसेना इथे भाजप विरुद्ध लढली. आमची मते घेऊन आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला. अशी कोणती निवडणूक आहे जे ते लढले नाहीत. मागील 25 वर्ष ते इथे लढतायेत. पण एकदाही त्यांच्या उमेदवाराचे डिपॉजिट वाचूव शकले नाहीत. इतिहास विसरुन हे लोकं बोलतात. मागच्यावेळी मी यांना उत्तर प्रदेशाचीही आठवण करुन दिली. राम जन्माच्या आंदोलनानंतर उत्तर प्रदेशमध्ये 200 जागा हे लढले होते. एकाही जागेवर हे डिपॉजिट वाचवू शकले नाहीत. उलट यांनी प्रत्येक वेळी आम्हाला डॅमेज करण्याचा प्रयत्न केला, असं फडणवीस म्हणाले.
मोदीजींचे फोटो लावून मत मागितली
फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात सगळ्यांनी पाहिले आहे . भाजपसोबत युतीमध्ये निवडणूक लढले आणि सरकार काँग्रेस-एनसीपी सोबत. भाजपच्या स्टेजवर मोदीजींनी घोषणा केली भाजपच्या मुख्यमंत्र्याची. त्याला तुम्ही समर्थन दिलं. एवढच नव्हे तर तुमच्या सर्व लोकांनी मोदीजींचे फोटो लावून मतं मागितली आणि केवळ मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही युती धर्म मोडला. महाराष्ट्रच्या जनतेला माहीती आहे की कोणी युती धर्म मोडला, असं फडणवीस म्हणाले.
संजय राऊत बोलतात त्याने आमचं मनोरंजन होतं
संजय राऊत यांच्या आरोपावर बोलताना फडणवीस म्हणाले की, संजय राऊत जे बोलतात त्याने आमचं मनोरंजन होतं. पण माझा सवाल आहे. एखादं वक्तव्य केले म्हणून नारायण राणेंना अटक करायची. जी घटना घडली नाही त्यासाठी आशिष शेलारांवर खटला भरायचा. नितेश राणे यांचं नाव गोवून त्यांना अटक करायची. केवळ मुख्यमंत्र्यांच्या पत्नींना राबडी म्हटलं म्हणून 25-25 पोलीस पाठवून त्यांना अटक करायची. पत्रकारांना अटक करायची. हा एजेंसीचा सदुपयोग आहे. जर तक्रारी मिळत असतील त्यात पुरावे मिळाले आणि जर एजेंसीने अटक केली तर तो दुरूपयोग आहे. आता अनिल देशमुख यांच्या प्रकरणात जो खुलासा होत आहे, त्यानंतर तुम्ही ईडीची कारवाई चुकीची ठरवाल. आता अनिल देशमुख हे स्वःता त्यांच्या जबाबमध्ये शिवसेनेच्या नेत्यांबद्दल जे बोलतायेत त्यावर काय ईडीने चुपचाप बसाव. ही दुटप्पी भूमिका आहे. जर ईडीने कुठली चुकीची कारवाई केली असेल तर त्यांना न्यायालयात जावं. खरं म्हणजे या सरकारच्या माध्यमातून पोलिसांचा जो गैरवापर चालला आहे अशा 100 घटना मी सांगू शकतो, असं फडणवील म्हणाले.