Exclusive : उत्पल पर्रिकरांना तिकीट नाकारलं नाही तर...; देवेंद्र फडणवीसांची विविध प्रश्नांवर थेट उत्तरं
Goa election 2022 : पाच राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. गोव्यातही राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी साधलेला संवाद
Devendra Fadnavis : सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील अनेक नेते गोव्यात प्रचारासाठी तळ ठोकून बसले आहेत. यातीलच एक नेते म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस. फडणवीस हे सध्या गोव्यात प्रचार करत असून, गोव्यात भाजपची नेमकी स्थिती काय? भाजपला गोव्यात जनतेचा प्रतिसाद मिळतोय का? भाजपसमोर नेमकी आव्हानं काय आहेत. यासंदर्भात एबीपी माझाने देवेंद्र फडणवीस यांच्याशी साधलेला संवाद....
1) गोव्यामध्ये काँग्रेसचा Under current असल्याच बोललं जातय. त्यात तुम्ही मिशन 22+ चा नारा दिलाय. आताची काय परिस्थती आहे? मिशन 22+ पास होणार का?
गोव्यात काँग्रेसचा Undercurrent असण्याचे काही कारण नाही. गोव्यात भाजप सरकारने जे काम केलं आहे, त्याला पाहूनच लोकं इथं मतदान करतील. काँग्रेसने इथे इतकी वर्ष काय केलं, तर फक्त भ्रष्टाचार. लोकांना माहीत आहे की, काँग्रेसचे सरकार आलं तर राज्याची वाईट परिस्थिती होईल, म्हणून इथं पुन्हा एकदा भाजपचे सरकार येईल.
2) मनोहर पर्रीकरांविना ही निवडणूक असणार आहे, म्हणून यावेळेला निवडणूक सोप्पी नसेल. ही निवडणूक खूप आव्हानात्मक असेल तुमच्यासाठी
आव्हान निश्चित आहे. मनोहर पर्रिकर असते तर परिस्थिती थोडी वेगळी असती पण प्रमोद सावंत यांनी मागच्या तीन वर्षात खूप चांगल काम केलं आहे. त्या कामांची पोचपावती या निवडणुकीत आम्हाला मिळेल.
3) आपण मिशन 22+ नारा दिला आहे, पण आपले सर्वच विरोधक दावा करत आहेत की, साखळी इथून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा पराभव हा निश्चित आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात धर्मेश उमेदवार म्हणून मजबूत आहेत. त्यांच्यावर दबाव आण्यासाठी तुम्ही त्यांच्यावर खोटे केसेस टाकताय असाही आरोप आहे.
विरोधकांचे हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. ही गोष्ट खरी आहे की, सर्वच पक्ष प्रमोद सावंत यांना पाडण्यासाठी भरपूर पैसे खर्च करत आहे. सर्व प्रकारचे प्रयत्न सुरु आहेत. पण साखळीच्या मतदाराला ज्याने त्यांच्यासाठी काम केलं आहे असा मुख्यमंत्री हवा आहे. म्हणून त्यांच्या पराभवाचा काही प्रश्नच उरत नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
4) मायनॉरिटी तुमच्याशी नाराज आहे असं सांगतील जातं. चर्च या वेळेला महत्वाची भूमिका बजावणार आहे. जसं मनोहर पर्रिकर सर्वांना सोबत घेऊन चालले होते, तसं प्रमोद सावंत सर्व धर्मांना सोबत घेऊन नाही गेले?
काँग्रेसचे सगळा प्रयत्न मायनॅारिटी वोटबँक आपल्यासोबत करुन भाजपला हरवण्याचा आहे. पण तसे काही होणार नाही. मागच्या 10 वर्षात एकही काम, घटना मायनॅारिटी विरुद्ध झाली असल्याचे दाखवावे. सर्व धर्मांना सोबत घेऊन आम्ही पुढे चाललोय.
5) मनोहर पर्रिकरांच्या नावावर आपण मते मागता, मात्र त्यांच्या मुलाला तिकीट देत नाही. उत्पल पर्रिकर यांना टिकीट न देता तुम्ही बाबूश सारख्या एका क्रिमिनलला टिकीट देता?
मुळात काँग्रेसला मनोहर भाई विषय बोलण्याचा काही नैतिक अधिकार नाही. कारण ज्या काँग्रेसचा उमेदवार मनोहर पर्रिकरांनी पाप केले म्हणून त्यांना नळी लावून शेवटचे दिवस काढावे लागले असे म्हणतो, ही काँग्रेस आम्हाला मनोहर भाईंबद्दल आदर कसा करायचा हे शिकवणार का. उत्पल पर्रिकर यांना चार जागा दिल्या होत्या. त्यापैकी एक जागा लढावी आणि नंतर पुढच्या निवडणुकीत पणजीमधून तिकीट देऊ असे म्हंटले होते. पण त्यांनी ते मान्य केलं नाही. आम्ही उत्पल पर्रिकर यांना तिकीट नाकारलं नाही. तर उत्पल यांनी भाजपचे तिकीट नाकारले ही वस्तूस्थिती आहे. उत्पल यांच्या मागे कोण आहे हे आम्हालाही माहित आहे.
6) तुमच्या उमेदवारांची लिस्ट मी पाहिली यात 10 पेक्षा जास्त काँग्रेसमधून तमुच्या पक्षात आलेल्या नेते म्हणजे 25 टक्के उमेदवार. यामुळे मुळचे भाजपचे कार्यकरते नेते नाराज असल्याचं सांगितलं जातय.
काँग्रेसमधून जे 10 लोकं आले आहेत. त्यापैकी फक्त 4 ते 5 जणांना उमेदवारी दिली आहे. बाकी सगळे भाजपचे उमेदवार आहेत. काँग्रेस, आप, टीएमसी यांनी देखील दुसऱ्या पक्षातून उमेदवार घेतले आहेत. त्याबद्दल का नाही बोलत हे पक्ष.
7) लक्ष्मीकांत पारसेकर, मायकल लोबोसारखे मोठे नेते पक्ष सोडून गेले. त्यांचा आरोप आहे की आताची भाजप मनोहर पर्रिकर यांनी उभी केलेली भाजप नाही.
लक्ष्मीकांत पारसेकर यांना पक्षाने मुख्यमंत्री बनवलं. मुख्यमंत्री असताना प्रचंड मोठ्या फरकारने निवडणूक हरले होते. आम्ही सर्वे केला त्यामध्येही त्यांचा पराभव होताना दिसून येत होता. आम्ही त्यांना ते सांगितलं, त्यांना मी केंद्रीय नेत्यांकडे नेलं. त्यांना मोठी जबाबदारी देण्यास सांगितलं. हे पण त्यांनी मान्य केलं नाही. मायकल लोबो यांना स्वःतासाठी. पत्नीसाठी, इतर पाच जणांना तिकीट द्या असे सांगितले. पण ते शक्य नव्हतं म्हणून ते गेले.
8) आपण स्वःताला पार्टी विथ डिफ्रेन्स म्हणतो, तरीही आपण पणजी इथून उत्पल पर्रिकरांना तिकीट न देतां बाबूश ला टिकीट दिलं, ज्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत. असे इतर उमेदवारही आहेत. भाजप हा गुंडांचा पक्ष आहे असे म्हटलं जाते.
मी स्वःता मुख्यमंत्री असताना माझ्यावर सर्वात जास्त गुन्हे होते. माझ्यामागे केजरीवाल होते पण आम्ही काही गुंड आहोत का. हे सगळं राजकीय गुन्हे आहेत. तुम्ही इतर पक्षाचे उमेदवार पाहा ना त्यांच्यावर कोणते गुन्हे आहेत.
9) पण बाबूशसारख्या उमेदवारावर serious criminal गुन्हे आहेत?
बाबूश यांच्यावरचे गुन्हे भाजपमध्ये येण्याआधीचे आहेत. पर्रिकर मुख्यमंत्री असताना बाबूश यांना तिकीट दिलं. त्याची इमेज जर वाईट असती तर 2019 ला पोटनिवडणूकीमध्ये जनतेने त्यांना निवडून दिलं नसतं. शेवटी विजय होणाऱ्या उमेदवारालाच तिकीट दिलं जात.
10) विरोधक म्हणतायत भाजपमध्ये 13 उमेदवार आज ईडी, सीबीआय, एनसीबीच्या कस्टडीमध्ये असले पाहिजे होते, पण त्यांना भाजपने उमेदवारी दिली?
हे बोलणारे कोण आहेत, ज्यांच्या पक्षात असे उमेदवार आहेत.
11) पण तुमचेच माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी तुमच्या सरकारवर कोविडमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. ज्यानंतर त्यांना काढण्यात आलं?
सत्यपाल मलिक साहेब हे outspoken आहेत. ते बोलण्याकरता प्रसिद्ध आहेत. परंतू त्यांच्या पत्राचा विपर्यास होतोय हे लक्षात आलं. मग त्यांनी त्यावर एक खुलासा दिला आहे, आरोप मागे घेतले आहेत. पण काँग्रेसने ते कधीही नाही सांगितलं. पहिल्या पत्राचा विपर्यास करायचा आणि दुसऱ्या पत्राबाबत काही बोलायच नाही हे काँग्रेसचे इथे उद्योग चालले आहेत. खोटं बोलून हे सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.
11) आप आणि टीएमसी भाजपची B टीम आहे. आरोप होतायत की या दोन्ही पक्षाला फंड भाजप पुरवत आहे?
हा खेळ या तिन्ही पक्षांची मिलीजुली कुस्ती चालली आहे. हे सगळे मिळून strategic लढाई भाजपशी लढत आहे. यांनी भाजपची मतं खाण्यासाठी उमेदवार दिले आहेत.
12) मायनिंगच्या मुद्यावर भाजप जनतेशी खोटं बोलली अस म्हंटलं जातं. काँग्रेस मायनिंगवर पीएसई रिपोर्ट सार्वजनिक करण्याची मागणी करत आहे?
मायनिंगची जी काही सगळी वाताहत झाली ती काँग्रेसच्या काळात झाली. हे सगळं काँग्रेसच पाप आहे. पण भाजप धोरणी आहे, ecologically sustainable मायनिंग झालं पाहिजे. म्हणून आम्ही मायनिंग कॉर्परेशन तयार केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आम्ही डंप पॉलिसी तयार करुन, पुढच्या 6 महिन्यात आम्ही मायनिंग सुरु करु. आणि हे फक्त भाजपच करु शकतं.
13) तुमच्यावर घोडेबाजार करण्याचा आरोप होतो. 2017 मध्ये जे झालं त्याला पाहता काँग्रेस, आपने आपल्या उमेदवारांना शपथा दिल्या. यावेळेला देखील जर तशी परिस्थती राहिली तर तुम्ही इतर पक्षांच्या उमेदवारांना फोडाल?
आम्हाला का दोष देता, तुमचं नेतृत्व कमजोर आहे म्हणून तुमची लोकं आमच्यासोबत येतात. तुमचं नेतृत्व मजबूत करा ना. आम्ही घोडेबाजार केला नाही. यावेळेला तर आम्हाला इतर कोणाची गरज पडणारही नाही.
14) टीएमसी, आप परफॉर्मन्सकडे कसं पाहता. ते खात उघडतील असं दिसतय.
सगळे एकमेकांना आतून मदत करुन भाजपला पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. हे मिलीजुली सर्कस आहे.
14) शिवसेना देखील इथे निवडणूक लढत आहे. आदित्य ठाकरे गोवा दौऱ्यात बोलताना म्हणाले की शिवसेना गोव्यात भाजपमुळे वाढू शकली नाही. कारण शिवसेनेने युतीधर्म पाळला आणि गोव्यात इतकी वर्ष भाजपला मोठ करण्यात मदत केली.
आदित्य ठाकरेंना इतिहासच माहित नाही. पूर्ण ताकतीने शिवसेना इथे भाजप विरुद्ध लढली. आमची मते घेऊन आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला. अशी कोणती निवडणूक आहे की जे ते लढले नाहीत. मागील 25 वर्ष ते इथे लढतायेत. पण एकदाही त्यांच्या उमेदवाराचे डिपॉजीट वाचूव शकले नाहीत. इतिहास विसरुन हे लोकं बोलतात. मागच्यावेळी मी यांना उत्तर प्रदेशाचीही आठवन करुन दिली. राम जन्माच्या आंदोलनानंतर उत्तर प्रेदशमध्ये 200 जागा हे लढले होते. एकाही जाग्यावर हे डिपॉजीट वाचवू शकले नाहीत. उलट यांनी प्रत्येक वेळी आम्हाला डॅमेज करण्याचा प्रयत्न केला.
15) पण आदित्य ठाकरे म्हणाले की, भाजपने त्यांच्या सर्व मित्र पक्षांच्या पाठीत खंजीर खुपसला?
महाराष्ट्रात सगळ्यांनी पाहिले आहे ना भाजपसोबत युतीमध्ये निवडणूक लढले आणि सरकार काँग्रेस-एनसीपी सोबत. भाजपच्या स्टेजवर माननीय मोदीजींनी घोषणा केली भाजपच्या मुख्यमंत्र्याची, त्याला तुम्ही समर्थन दिलं. एवढचं नव्हे तर तुमच्या सर्व लोकांनी मोदीजींचे फोटो लावून लावून मत मागितली आणि केवळ मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही युती धर्म मोडला. महाराष्ट्रच्या जनतेला माहीती आहे की कोणी युती धर्म मोडला.
16) वाईन विक्रीवरून ठाकरे सरकार अडचणीत? वाद उच्च न्यायालयात पोहचला आहे. आण्णा हजारे यांनी आंदोलनाची भूमिका घेतली. सामाजिक कार्यकर्ते संदीप कुसाळकर यांनी वाईन विक्रीच्या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली केली आहे. सरकार आता हरकती, सूचना मागवू असं महणतयं.
हे सरकार वाईन आणि दारु विकणाऱ्यांकरीता जेवढी संवेदनशील आहे, तितकी कोणाही करता नाही. त्याच कारण कोविड काळात कोणालाही मदत न करणाऱ्या सरकारने बार मालकांना मदत देण्यासाठी त्यांची लायसेंस फी कमी केली. गरिबांना मदत नाही पण बार मालकांना नुकसान झालं म्हणून त्यांना मदत दिली. त्यानंतर विदेशी मद्यावरचा कर आर्धा केला. वाईन प्रोत्साहन धोरण जाहीर करुन महाराष्ट्राला मद्य राज्य बनवण्याचं काम या सरकारने केलं. मला कळत नाही की हे सरकार का असं वागतय. याला आमचा विरोध आहे आणि आण्णा हजारे यांच्या मागणीला पाठिंबा आहे. आण्णांसाठी तरी हा निर्णय मागे घ्यावा.
17) संजय राऊत म्हणाले महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी केंद्रीय यंत्रणेचा वापर केला जातोय
संजय राऊत जे बोलतात त्याने आमचं मनोरंजन होतं. पण माझा सवाल आहे. एखादं वक्तव्य केले म्हणून नारायण राणेंना अटक करायची. जी घटना घडली नाही त्यासाठी आशिष शेलारांवर खटला भरायचा. नितेश राणे यांचं नाव गोवून त्यांना अटक करायची. केवळ मुख्यमंत्र्यांच्या पत्नींना राबडी म्हंटलं म्हणून 25-25 पोलीस पाठवून त्यांना अटक करायची. पत्रकारांना अटक करायची. हा एजेंसीचा सदुपयोग आहे. जर तक्रारी मिळत असतील त्यात पुरावे मिळाले आणि जर एजेंसीने अटक केली तर तो दुरूपयोग आहे. आता अनिल देशमुख यांच्या प्रकरणात जो खुलासा होत आहे, त्यानंतर तुम्ही ईडीची कारवाई चुकीची ठरवाल. आता अनिल देशमुख हे स्वःता त्यांच्या जबाबमध्ये शिवसेनेच्या नेत्यांबद्दल जे बोलतायेत त्यावर काय ईडीने चुपचाप बसाव. ही दुटप्पी भूमिका आहे. जर ईडीने कुठली चुकीची कारवाई केली असेल तर त्यांना न्यायालयात जावं. खरं म्हणजे या सरकारच्या माध्यमातून पोलिसांचा जो गैरवापर चालला आहे अशा 100 घटना मी सांगू शकतो.
काल परवा रवी राणांची जी घटना घडली. आयुक्तांवर शाही फेकणं हे चुकीच आहे. पण जेव्हा रवी राणा तिथे नाही आहेत, त्यांच्यावर तुम्ही 307 कलम लावता. मग किरीट सोमय्यांवर जो हल्ला झाला. रवी राणांचा न्याय संजय राऊतांवर का नाही. नवनीत राणांना जी वागणूक देण्यात आली. आज गावोगावी रोज आमच्या लोकांवर खटले भरले जात आहेत. गोपीचंद पडळकर यांना तर मारुन टाकण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर त्यांना सुरक्षारक्षक म्हणून एक शिपाई देत नाही हे सरकार. हे एजेंसीच्या दुरूपयोग बद्दल बोलतात. माझा तर सवाल आहे की, महाराष्ट्रामध्ये लोकशाही आहे का? बंगालच्या दिशेने महाराष्ट्र जात आहे. जसं बंगालमध्ये सरकार विरुद्ध बोललो तर हातपाय तोडून टाकले जातात. तसेच किरीट सोमय्या सरकारविरुद्ध बोलतात म्हणून इतका मोठा गोटा त्यांच्या डोक्यात टाकण्याचा प्रयत्न झाला. नशीबाने ते वाचले.