Deepak Kesarkar : शपथविधी मंत्र्यांचा असतो तर अधिवेशन आमदारांचं असतं, दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले?
Deepak Kesarkar : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी मंत्री दीपक केसरकर यांनी शिर्डीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोकण विभागाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं.
शिर्डी, अहिल्यानगर : शिवसेना नेते माजी मंत्री दीपक केसरकर आज साईदरबारी दाखल झाले होते. दीपक केसरकरांना मंत्रिमंडळात संधी मिळालेली नाही. नागपूर येथे मंत्रिमंडळाचा शपथ सुरू असताना तर दुसरीकडे मंत्रिमंडळात संधी न मिळालेले दीपक केसरकर शिर्डीत पोहोचले होते. त्यांनी साईबाबांच्या धूप आरतीला हजेरी लावली.
शपथविधी निमंत्रणाबाबत विचारलं असता शपथविधी हा मंत्र्यांचा असतो,अधिवेशन हे आमदारांसाठी असते. उद्यासकाळपासून अधिवेशन सुरू होणार असून मला सकाळी अधिवेशनसाठी जायचं आहे, त्याअगोदर मी साईदरबारी आलोय, असं दीपक केसरकर म्हणाले. ज्या लोकांचा मंत्री म्हणून शपथविधी होणार आहे त्यांना निरोप गेलेत त्यामुळे ते शपथविधीला उपस्थित राहतील, असंही ते म्हणाले.
काही गोष्टी चांगल्यासाठी घडत असतात , मी दोन वेळा मंत्री म्हणून काम केलं आहे. आमचा कोकण विभाग दुर्लक्षित राहिलेला आहे.आपल्या विभागाची सेवा अधिकची करता यावी अशी साईबाबांची इच्छा असेल म्हणून हा निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी घेतला असेल असं मी समजतो. मंत्रिमंडळात समावेश न झाल्यानंतर दीपक केसरकर यांनी शिर्डीत ही प्रतिक्रिया दिली आहे. मी आधीच सांगितलं होतं, मला यावेळी जास्त सेवा कोकण विभागाची करायची आहे, असंही ते म्हणाले.
आपल्या नेत्याला किती त्रास द्यायचा?
एकनाथ शिंदे हे एक फायटर नेते आहेत. परिस्थितीशी झुंज देत काम करण्याची क्षमता ते सिद्ध करत असतात. खरी शिवसेना कुणाची याच योग्य उत्तर एकनाथ शिंदे यांनी जनतेकडून घेतलंय. एकनाथ शिंदे यांच्यात जे गुण आहेत ते एक शिवसैनिकाचे आहेत हे त्यांनी महाराष्ट्राला दाखऊन दिलंय, असं केसरकर म्हणाले.माझी शिंदे साहेबांशी जबाबदारीबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही. मी त्यांना एकदाच भेटलो होतो तेव्हा आमदरांची खूप गर्दी होती. तेव्हा मलाच वाटलं आपल्या नेत्याला आपण किती त्रास द्यायचा त्यानंतर मी एकदाही भेटलो नाही, असं दीपक केसरकर म्हणाले.
मंत्रिमंडळातून डावलने हा काय भाग नसतो. शिक्षण क्षेत्रात क्रांती करणारे निर्णय मी घेतले. मराठी भाषा विभाग हा दुर्लक्षित विभाग होता त्याला मराठी भाषा धोरण दिलं. मी जे काही केलं त्यात मी समाधानी असून साईबाबा जे काही घडवतात ते चांगल्यासाठीच असतं. मी अधिवेशनाला जाण्याअगोदर साईबाबांचे दर्शन घेत असतो. मी मंत्रिमंडळात असतो तर काल साईबाबांचे दर्शन घेऊन आज नागपूर विधानभवन येथे स्पेशल विमानाने गेलो असतो. मी नसल्यामुळे त्या ठिकाणी फार फरक पडत नाही. आमच्या विभागातील पदाधिकार्यांना भेटून मी अभिनंदन केलं आहे, असंही केसरकर म्हणाले.
जी आश्वासन आम्ही निवडणुकीत दिली ती पूर्ण होऊन आमच्या सरकारकडून जनतेची सेवा व्हावी. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये चांगलं यश मिळावं. नागपूरचे अधिवेशन संपल्यावर मी थेट नागपूर येथून मतदारसंघात जाणार आहे. आमचा सिंधुदुर्ग जिल्हा एक नंबर व्हावा यासाठी जी सेवा घडवायची असेल ती साईबाबांना माझ्या हातून घडवायची असेल, असंही केसरकर म्हणाले. मी महाराष्ट्राची खूप सेवा केली.मला जबाबदारी द्यायची असेल तर विभागाची द्यावी. जेव्हा मंत्री होतो तेव्हा महाराष्ट्राची सेवा केली महाराष्ट्राचा होतो आता मी माझ्या विभागात काम करू शकेल, असं दीपक केसरकर म्हणाले.
इतर बातम्या :