Chandrashekhar Bawankule : लाडक्या बहिणींवरील धनंजय महाडिक यांच्या विधानावर चंद्रशेखर बावनकुळे यांचे परखड मत, म्हणाले..
Chandrashekhar Bawankule: भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत लाडक्या बहिणींना धमकावल्या प्रकरणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया देत परखड मत मांडले आहे.
नागपूर : कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजप उमेदवार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Scheme) धमकावून अडचणीत आलेल्या भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून महाडिक यांना आक्षेपार्ह विधानासाठी नोटीस धाडण्यात आली आहे. खासदार महाडिक यांनी महात्मा फुले युवक मंडळ फुलेवाडी पाचवा स्टॉप फुलेवाडी (ता.करवीर, जि. कोल्हापूर) येथील जाहीर सभेत धनंजय महाडिक यांनी केलेल्या भाषणात भारतीय न्यायसंहिता-2023 कलम 179 अन्वये आदर्श आचारसंहितेचे उल्लघंन केल्याचे निदर्शनास आल्याने आयोगाकडून त्यांना नोटिस धाडण्यात आली आहे. त्यामुळे याबाबतचा खुलासा तत्काळ सादर करण्यात यावा अशी नोटीस निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून यांनी धनंजय महडिक यांना दिली आहे.
दरम्यान, याच मुद्द्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आपली प्रतिक्रिया देत परखड मत मांडले आहे. लाडकी बहीण योजनेवरुन असे बोलणे चुकीचे आहे. धनंजय महाडिक यांनी त्याबद्दल माफी मागितली आहे. मात्र भाजपच्या कोणत्याही नेत्यांनी भावनेच्या भरात किंवा उत्साहात असे असे वक्तव्य करू नये. असे मी आवाहन करतो. तसेच धनंजय महाडिक यांनी त्या वक्तव्याचे खंडन करून माफी मागितली असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेसच रक्त विकास करण्याचा नाही- चंद्रशेखर बावनकुळे
काँग्रेसचा आणि महाविकास आघाडीचा जाहीरनामा हा अफवा असून त्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. कारण काँग्रेसच रक्त विकास करण्याचा नाही. मल्लिकार्जुन खर्गे परवा या विरोधात बोलले आणि काँग्रेसचे लोक लाडकी बहीण योजनेच्या विरोधात कोर्टातही गेले. मताच्या भीतीपोटी त्यांनी पुन्हा हा खोटारडेपणा सूरू केला आहे. अशी टीकाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी मविआ आणि काँग्रेसवर केलीय.
शरद पवारांचा मोठा अनुभव आहे. त्यांच्याबद्दल मी टिप्पणी करणे योग्य नाही. मात्र महाराष्ट्राची जनता आता महायुतीच्या बाजूने आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार म्हातारा झालो तरी सरकार बदलणार असल्याचे म्हणाले होते. यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले धनंजय महाडिक?
महाडिक म्हणाले की, लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत, सभेत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून आम्हाला द्या आम्ही त्यांची व्यवस्था करतो. जर इथं काँग्रेसची निघाली आणि त्यामध्ये आपल्या योजनेचे 1500 रुपये घेतात त्या महिला दिसल्या, तर त्यांचे फोटो काढून घ्या, नावे लिहून घ्या. घ्यायचे आपल्या शासनाचे आणि गायचे त्यांचे असे चालणार नाही. महाडिक पुढे म्हणाले की, अनेक ताया महाराष्ट्रात आहेत, छाती बडवत आहेत. आम्हाला नकोत पैसे, आम्हाला नकोत आम्हाला सुरक्षा पाहिजे. पैसे नकोत? राजकारण करता पैशांचे? काँग्रेसच्या सभेला महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे, काँग्रेसच्या रॅलीला महिला दिसल्या जाऊन त्यांचे फोटो काढायचे. आम्ही व्यवस्था करतो त्यांची, अशी धमकीच महाडिक यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या