पहिल्यांदा लाडक्या बहिणींना धमकी, मग म्हणाले, लव्ह जिहाद होऊ नये म्हणून बोललो अन् नंतर चौफेर टीकेनंतर माफीनामा; महाडिकांचा अवघ्या काही तासात 'सेल्फगोल'!
सोशल मीडियामधून व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होताच तसेच विरोधी पक्षांकडून सडकून टीका होताच भाजप खासदार धनंजय महाडिक नंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये माफीनामा सादर केला.
Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana In Kolhapur : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) कोणाची डोकेदुखी वाढवणार? अशी चर्चा महायुती आणि महाविकास आघाडीसह राज्यातील सर्वच राजकीय पक्षांमध्ये रंगली असताना भाजप खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana In Kolhapur) यांनी कोल्हापूरमध्ये त्यांचे बंधू अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ थेट लाडक्या बहिणींनाच धमकावल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. अत्यंत आक्रमक शैलीमध्ये धनंजय महाडिक यांनी लाडक्या बहिणींना धमकी दिल्यानंतर नंतर या प्रकरणावर पहिल्यांदा माफी मागण्याऐवजी लव्ह जिहाद होऊ नये म्हणून म्हणून बोललो अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर सोशल मीडियामधून व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होताच तसेच विरोधी पक्षांकडून सडकून टीका होताच भाजप खासदार धनंजय महाडिक नंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये माफीनामा सादर केला आणि माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला अशी प्रतिक्रिया दिली. मात्र तोपर्यंत पुलाकडून बरेच पाणी वाहून गेलं होतं.
महाडिकांचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल
भाजप आणि महायुतीची भाषा अशीच असल्याचे प्रतिक्रिया विरोधी पक्षांमधून उमटत आहेत. लोक कल्याणकारी योजना ह्या राजकीय स्वार्थासाठी असल्याची टीका सुद्धा आता विरोधी पक्षांकडून होऊ लागली आहे. त्यामुळे महाडिक यांच्या वक्तव्याने अवघ्या काही तासांमध्ये सेल्फगोल झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. महाडिक यांनी केलेल्या वक्तव्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांसह राज्य पातळीवरून त्यांच्यावर सडकून टीका करण्यात येत आहे. त्यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे. कोल्हापूर दौऱ्यावर कॉंग्रेस उमेदवारच्या प्रचारार्थ आलेल्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सुद्धा राज ठाकरे स्टाईलने 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत धनंजय महाडिक यांचा चांगलाच समाचार घेतला. महाराष्ट्रातील विरोधी नेत्यांकडूनही हा व्हिडिओ व्हायरल केला जात असताना देशपातळीवर सुद्धा विरोधी महाडिक यांचा व्हिडिओ व्हायरल करून महायुतीवर सडकून टीका केली जात आहे.
काय म्हणाले धनंजय महाडिक?
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात फुलेवाडीमध्ये भाजप उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले की, लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत, सभेत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून आम्हाला द्या आम्ही त्यांची व्यवस्था करतो. जर इथं काँग्रेसची निघाली आणि त्यामध्ये आपल्या योजनेचे 1500 रुपये घेतात त्या महिला दिसल्या, तर त्यांचे फोटो काढून घ्या, नावे लिहून घ्या. घ्यायचे आपल्या शासनाचे आणि गायचे त्यांचे असे चालणार नाही. महाडिक पुढे म्हणाले की, अनेक ताया महाराष्ट्रात आहेत, छाती बडवत आहेत. आम्हाला नकोत पैसे, आम्हाला नकोत आम्हाला सुरक्षा पाहिजे. पैसे नकोत? राजकारण करता पैशांचे? काँग्रेसच्या सभेला महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे, काँग्रेसच्या रॅलीला महिला दिसल्या जाऊन त्यांचे फोटो काढायचे. आम्ही व्यवस्था करतो त्यांची, अशी धमकीच महाडिक यांनी दिली आहे. जर मोठ्याने कोण भाषण करायला लागली, दारात आली तर तिला एक फॉर्म द्यायचा आणि लगेच करतो बंद म्हणायचे पैसे. आमच्याकडे काय लय पैसे झालेले नाहीत, असे वक्तव्य महाडिक यांनी केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या