(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BMC Election : ठाकरेंच्या बैठका, शिंदेंचं इनकमिंग... पक्षातील आऊटगोईंग उद्धव ठाकरे रोखणार का ?
BMC Election : आधी आमदार, मग खासदार आणि त्यानंतर नगरसेवक आणि कार्यकर्ते हळूहळू एकमागोमाग एक ठाकरेंचे सहकारी शिंदेसोबत सहभागी झाले आहेत.
Eknath Shinde vs Uddhav Thackeray : राज्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे इनकमिंग सुरु असताना ठाकरेंनी मात्र बैठकांचा सिलसिला सुरु केला आहे. आधी नगरसेवकांच्या मग विभागप्रमुखांच्या बैठक झाल्या आहेत. आपल्या पक्षाला उभारणी देण्याबरोबर पक्षातलं आऊटगोईंग थांबवणे हे सर्वात मोठं आव्हान आहे.
आधी आमदार, मग खासदार आणि त्यानंतर नगरसेवक आणि कार्यकर्ते हळूहळू एकमागोमाग एक ठाकरेंचे सहकारी शिंदेसोबत सहभागी झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या त्या ऐतिहासिक बंडाला एक वर्ष पुर्ण झालं पण अद्याप शिंदेकडेचं इनकमिंग काही कमी झालेलं नाही. अवघ्या काही दिवसांपूर्वीच विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेंची वाट पकडली. आता शिंदेंना जाऊन एक वर्ष झालं तरी ठाकरेचं आऊटगोईंग काही बंद होईना आणि त्यामुळे सलग ४ दिवस उद्धव ठाकरे बैठका आणि सभा घेताना दिसले.
कसा होती मागील चार दिवसांचा कार्यक्रम
१८ जून उद्धव ठाकरे शिबिरात केलं भाषण
१९ जून उद्धव ठाकरे वर्धापन दिनी केलं मार्गदर्शन
२० जून मुंबईतील माजी नगरसेवकांसोबत संवाद
२१ जून मुंबईतील विभागप्रमुखांसोबत केली चर्चा
आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा इतकीच महत्वाची मुंबई महापालिका महत्वाची मानली जातेय. या मुंबई महानगरपालिकेवर झेंडा फडकवण्याचा भाजप आणि शिवसेना सज्ज झालीय. मुंबई महानगरपालिकेसाठी अमित शाहा यांनी देखील भाजपच्या माजी नगरसेवकांना कानमंत्र दिल होता. गेली २५ वर्ष महापालिकेवर सत्ता असलेल्या ठाकरेंना जमिन दाखवा, असे आदेश शाहांनी दिले होते. त्यामुळे येत्या काळात ठाकरेंचे काही नगरसेवक शिंदेसोबत जाण्याची शक्यता आहे. तेच रोखण्याचं ठाकरेंसमोर आव्हान असणार आहेत.
एक नजर टाकूयात २०१७ च्या मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीवर -
शिवसेना - ८४+ अपक्ष ३+ ६ ( मनसेतून आलेले ) = ९३
भाजप - ८३ + १ अपक्ष +१ अभासे = ८५
काँग्रेस - ३०
राष्टृवादी - ९
सपा - ६
एमआयएम - २
मनसे - १
ठाकरेच्या शिवसेनेतून आतपर्यंत १५ नगरसेवक शिंदेसोबत आले आहेत, तर शेकडो कार्यकर्ते आहेत जे आगामी मुंबई महानगरपालिकेसाठी इच्छुक आहेत. तर अनेक नगरसेवक हे वेटिंगवर आहेत जे योग्यवेळी एकनाथ शिंदेकडे यांच्याकडे जाण्याच्या तयारीत आहेत, असं बोललं जातंय. हेच आऊटगोईंग थांबवणं ठाकरेंसाठी तितकं सोपं नाही. बाळासाहेबांचे विचार विरुद्ध बाळासाहेबांचे वारसदार असा संघर्ष राज्यात सुरु झाला आहे, तळागाळ्यातल्या कार्यकर्त्यांना भेटणं, त्यांचीकामं करणं ही एकनाथ शिंदेंची जमेची बाजू ठरली आणि त्यामुळे मातोश्रीपेक्षा शिंदेंना हळूहळू पसंती वाढू लागली. हाच मुद्दा खोडून काढण्याचा ठाकरेंचा प्रयत्न आहे. सर्व कार्यकर्त्यांना भेटून शिंदेचं इनकमिंग रोखण्यासाठी ठाकरे व्यूव्हरचना आखत आहेत. आता यात ठाकरे यशस्वी होतायत की शिंदे हे लवकरच कळेल.