Andheri : मुरजी पटेल भाजपकडून लढणार की शिंदे गटाकडून? सस्पेन्स कायम, अंधेरीचा उमेदवार आज रात्री ठरणार
Andheri East Bypoll 2022 : ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला असून मुरजी पटेल भाजपमधून लढणार की शिंदे गटातून हे अद्याप स्पष्ट नाही.
मुंबई : एकीकडे ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला असताना दुसरीकडे ही जागा भाजपने लढवायची की शिंदे गटाला द्यायची याचा अद्याप निर्णय होत नाही. त्यामुळे भाजपचे मुरजी पटेल (Murji Patel) हे भाजपकडून लढणार की शिंदे गटातून हा सस्पेन्स अद्याप कायम आहे. आज रात्री वर्षा बंगल्यावर या संबंधित महत्त्वाची बैठक होणार असून त्यामध्ये मुरजी पटेल यांचा पक्ष ठरणार असल्याची खात्रीलायक बातमी आहे.
भाजपचे मुरजी पटेल हेच ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्या विरोधात लढणार असल्याचं एव्हाना स्पष्ट झालं आहे. मुरजी पटेल यांना शिंदे गटातून उमेदवारी द्यावी असा मतप्रवाह भाजपमध्ये असल्याचं दिसून येतंय. फोनची वाट पाहा असा आदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुरजी पटेल यांना दिला असल्याची माहिती आहे.
अंधेरी विधानसभेसाठी कुणाला ऊमेदवारी द्यायची याबाबत आज रात्री वर्षा बंगल्यावर होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार आहे. ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्या बद्दल लोकांमध्ये असलेल्या सहानुभूतीचा विचार करता मुरजी पटेल यांना भाजपमधून नव्हे तर शिंदे गटातून उमेदवारी देण्यात यावी असा मतप्रवाह असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुरजी पटेल यांना भाजपातून की शिंदे गटातून ऊमेदवारी मिळणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
मुरजी पटेल यांनी अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली असली तरी त्यांना भाजपमधून उमेदवारी मिळणार का याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तसेच ही जागा नेमकी कोण लढवणार, भाजप की शिंदे गट हेही अद्याप ठरलं नाही.
अंधेरी पूर्व मतदारसंघासाठीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याचा प्रश्न सुटला असून त्या उद्या आपला अर्ज दाखल करणार आहेत. पण भाजप-शिंदे गटाचं अद्याप याबाबत काही ठरलं नाही. आज रात्री या निवडणुकीसाठी एबी फॉर्म मिळवण्यापूर्वी मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे.
पक्षादेश आल्यास माघार घेणार
भाजपचे नेते मुरजी पटेल यांनी गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघातून तयारी सुरू केली आहे. गेल्या वेळी त्यांचा शिवसेनेच्या रमेश लटके यांनी पराभव केला होता. गेल्या वेळी मुरजी पटेल हे अपक्ष होते. यंदा त्यांना भाजपची उमेदवारी मिळणार हे पक्कं होतं. पण शिवसेनेतील फुटीनंतर आता या जागेवर शिंदे गटाने दावा केल्याने ही जागा शिंदे गटासाठी सोडण्यात येणार असल्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे मुरजी पटेल हे शिंदे गटाकडून लढणार का हे पाहावं लागेल. दरम्यान, आपल्याला पक्षादेश आल्यास आपण माघार घेऊ असं मुरजी पटेल यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं होतं.