Ajit Pawar On Baramati Loksabha Election Result 2024: चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेलं वक्तव्य लोकांना आवडलं नाही, तेही बारामतीत येऊन..., अजित पवार स्पष्टच बोलले!
Ajit Pawar On Baramati Loksabha Election Result 2024: आम्ही कमी पडलो, म्हणून हरलो, असं अजित पवार यांनी सांगितले.
Ajit Pawar On Baramati Loksabha Election Result 2024: बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Election) नंणद सुप्रिया सुळे यांनी (Supriya Sule) भावजय सुनेत्रा पवार यांना (Sunetra Pawar) जोरदार धक्का दिला आहे. बारामती राखण्यात सुप्रिया सुळेंना यश मिळाले आहे. तर अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवारांचा पराभव झाला आहे. सध्या बारामतीत जल्लोष समोर आला आहे. बारामतीचा पराभव हा अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. आज अजित पवार यांनी पत्राकार परिषद घेत लोकसभा निडणुकीच्या निकालावरील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
बारामतीचा निकालाबद्दल आश्चर्य वाटतं. बारामतीकरांनी मला प्रचंड पाठिंबा दिला. मात्र यावेळी त्यांनी मला पाठिंबा कसा दिला नाही, माहिती नाही. लोकशाहीत जनमताचा कौल स्वीकारायचा असतो. आगामी विधानसभा निवडणुकीत सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीतील प्रमुख आहे त्यांच्याशी चर्चा करु, लोकसभा जागावाटपात त्रुटी राहिल्या. आम्ही कमी पडलो, म्हणून हरलो, असं अजित पवार यांनी सांगितले.
चंद्रकांतदादांनी केलेलं वक्तव्य लोकांना आवडलं नाही- अजित पवार
चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांबाबत केलेलं वक्तव्य लोकांना आवडलं नाही. तेही बारामतीत येऊन, मी याआधी देखील यावर बोललो होतो. तसेच बारामतीत मी कमी पडलो हे निर्विवाद सत्य आहे. कुठे कमी पडलो हे लोकांशी बोलल्यावरचं कळेल. विधानसभा निवडणूकीत त्या चुका टाळू, असं अजित पवार म्हणाले. तसेच मुस्लिम समाज आमच्यापासून दूर झाला. संविधान बदलण्याचा विरोधकांनी प्रचार केला त्याला मागासवर्गीय घटकाने पाठिंबा दिला, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते?
महायुतीने सुरुवातीच्या काळात बारामती लोकसभा मतदारसंघात बैठका घेतल्या होत्या. त्यावेळी एका बैठकीत भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, या बैठकीनंतर शरद पवार यांना बारामतीमधून संपविणार. बारामतीमधून शरद पवार आणि त्यांचे राजकारण भाजपला संपवायचे आहे. चंद्रकांतदादांच्या या वक्तव्याचे त्यावेळी तीव्र पडसाद उमटले होते. त्यावेळी देखील अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर नाराजी दर्शवली होती.
अजितदादांची साथ सोडणार नाही, आमदारांचा निर्धार-
लोकसभा 2024 च्या निवडणुकीनंतर आज अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वात मुंबईतील ट्रायडन्ट हॉटेलमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) च्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत पराभव झाला तरी चालेल, पण अजित पवार यांची साथ सोडणार नाही, असं आमदारांनी एकमताने निर्धार केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कुठलाही आमदार शरद पवार यांच्या पक्षातील आमदारांच्या संपर्कात नसल्याची ग्वाही देखील बैठकीला उपस्थित असणाऱ्यांनी दिल्याचं सांगण्यात येत आहे.