(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wardha : वर्ध्याच्या पोरीची कमाल, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
Wardha Latest Marathi News : सलग 24 तास शिकविण्याचा पल्लवीने केला विश्वविक्रम
Wardha Latest Marathi News : सलग 24 तास जीवशास्त्र अध्यापनाचा विश्वविक्रम विज्ञान शिक्षिका पल्लवी पाटोदकर बोदिले यांनी केला आहे. या विश्वविक्रमामुळे पल्लवी यांची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये करण्यात आली आहे. दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ आणि सेल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंगी येथील विद्यापीठ सभागृहात हा आगळावेगळा विक्रम नोंदविला गेला.
गत दहा वर्षांपासून पल्लवी सुरज बोदिले या जीवशास्त्र हा विषय शिकवत आहेत. या विक्रमाकरिता त्यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डससाठी पूर्वनोंदणी केली होती. त्यानुसार, गुरुवारी पहाटे 5.40 वाजता त्यांनी दत्ता मेघे सभागृहात जीवशास्त्र या विषयाचे विविध धडे पूरक आकृत्यांच्या मांडणीसह शिकविणे सुरू केले. या कालावधीत त्यांनी आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जीवशास्त्र तसेच शरीरविज्ञान शास्त्राच्या तासिका घेतल्या. तर, सायंकाळच्या सत्रात त्यांचे वयात येणाऱ्या मुलामुलींबाबत पालकांकरिता स्वतंत्र व्याख्यानही झाले.
प्रत्येक दोन व्याख्यानांच्या दरम्यान 10 मिनिटांची विश्रांती घेण्याची अधिकृत सवलत असताना त्याचाही फारसा वापर न करता पल्लवी बोदिले यांनी पूर्वघोषित 18 तासांचा विक्रम रात्री पूर्ण केला. मात्र विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण प्रतिसाद मिळत असल्याने आपला उत्साह कायम ठेवत पल्लवी बोदिले यांनी विज्ञान विषयांची मांडणी दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत सुरूच ठेवली.
या 24 तासांच्या सलग व्याख्यानात आवाजाचा स्तर आणि देहबोलीवर नियंत्रण ठेवत तसेच कोठेही न अडखळता व चुकीचा शब्दोच्चार येणार नाही, याची पूर्ण दक्षता घेत हे आव्हान त्यांनी यशस्वीरीत्या पेलले. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता या बायोलॉजी लेक्चर मॅराथॉनच्या विश्वविक्रमाची रीतसर घोषणा आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे नियुक्त परीक्षक डॉ. मनोज तत्ववादी यांनी केली. पल्लवी बोदिले यांना विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र, पदक व सन्मानचिन्हासह प्रदान करण्यात आले.
या आयोजनात सेल अकॅडमीचे संचालक सुरज बोदिले, दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठातील अलाईड हेल्थ सायन्सेसचे संचालक डॉ. अभ्युदय मेघे, संजय इंगळे तिगावकर, डॉ. सुधाकर शिंदे, बेन्नी सॅम्युअल, रितुराज चुडीवाले, पिंपळकर सर, स्वप्नील चरभे, अभिजित वानखेडे, अफसर पठाण, पुरुषोत्तम वाघमारे, कार्तिक व गौरव पाटोदकर यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमातील विविध सत्रात कुंबलकर समाजकार्य महाविद्यालय, सेल अकॅडमी तसेच विविध शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
आणखी वाचा :
Nashik : विद्यार्थी शेतात लावतात भेंडी, मिरची आणि टोमॅटो... नाशिकमधील शाळेत दिले जातात शेतीचे धडे
Agriculture : आधीच लम्पी त्यात सीएमव्ही, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ, केळीच्या बागाच काढाव्या लागतायेत
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI