(Source: Poll of Polls)
Nagpur University Exam : नागपूर विद्यापीठाकडून अखेर उन्हाळी परीक्षांच्या तारखांची घोषणा,विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अतिरिक्त वेळ
Nagpur University Exam Date : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अखेर उन्हाळी परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे.
Nagpur University Exam Date : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अखेर उन्हाळी परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे. मात्र, परीक्षा कोणत्या मोडमध्ये घेण्यात येईल, यासंदर्भात अद्याप ही कोणती घोषणा केलेली नाही. दरम्यान उन्हाळी परीक्षा ऑफलाइन मोडमध्ये होईल असे स्पष्ट संकेत विद्यापीठाकडून दिले जात आहेत.
उन्हाळी परीक्षांचे वेळापत्रक कसे आहे
उन्हाळा संपत आला तरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने उन्हाळी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलं नाही. त्यामुळे गेले काही दिवस विविध विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या होत्या. परीक्षा कोणत्या स्वरूपात होईल, ऑनलाइन होतील की ऑफलाईन या संदर्भात ही स्पष्टता नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम वाढलेला होता. काल नागपूर विद्यापीठाच्या विद्वत परिषदेची बैठक पार पडली. त्यात परीक्षांच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.
केव्हा सुरू होणार परीक्षा
पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा 8 जून पासून सुरू होतील. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा 15 जून रोजी सुरू होतील या आशयाचं विद्यापीठाने परिपत्रक जाहीर केले आहे. जुलै महिन्यापर्यंत सर्व परीक्षा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट विद्यापीठाने निश्चित केले आहे.
सर्व परीक्षा ऑफलाइन घेण्याचे संकेत
गेल्या महिन्यात नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा मिक्स मोडमध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देण्याची मुभा प्रदान करण्यात आली होती. त्यानंतर 25 एप्रिल रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील सर्व विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा या ऑफलाइन पध्दतीने घेण्यात याव्यात अशी सूचना केली. त्यानंतर नागपूर विद्यापीठाने ही त्यांचा निर्णय फिरवत सर्व परीक्षा ऑफलाइन मोडमध्ये घेण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, या बद्दल अद्याप अंतिम निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.
प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम सुरू
एकीकडे राष्ट्रसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने उन्हाळी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे नागपूर विद्यापीठावरही उन्हाळी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यासंदर्भात दबाव वाढलेला आहे. त्यामुळेच नागपूर विद्यापीठ प्रशासनाने सर्वच अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम सुरू केले असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त वेळ
नागपूर विद्यापीठाने ऑफलाइन पद्धतीने उन्हाळी परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला तर विद्यार्थ्यांना परीक्षा देताना 15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI