MBBS विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; विद्यापीठानं घेतला हा निर्णय
MBBS News : आता एमबीबीएस झाल्यावर विद्यार्थ्यांना त्याच महाविद्यालयात इंटर्नशिपचा कार्यकाळ पूर्ण करावा लागणार आहे.
MBBS News : एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एमबीबीएस विद्यार्थ्यांना यापुढे इंटर्नशिप कालावधीत कॉलेज बदलता येणार नाही. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने हा निर्णय घेतलाय. याआधी वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमात इंटर्नशिप कालावधीसाठी महाविद्यालय बदलीची सोय होती. मात्र या निर्णयामुळे आता एमबीबीएस झाल्यावर विद्यार्थ्यांना त्याच महाविद्यालयात इंटर्नशिपचा कार्यकाळ पूर्ण करावा लागणार आहे.
राष्ट्रीय आयुर्वविज्ञान आयोग नवी दिल्ली यांनी 28 नोव्हेंबरला देशातील Compulsory Rotating Medical Regulations 2021 यात काही अधिसूचना जाहीर केल्या होत्या. वैद्यकीय कोर्स पूर्ण केल्यानंतर करण्यात येणाऱ्या इंटर्नशिप कालावधीत विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप कधी आणि कुठे करावी याबाबत सुसूत्रता आणण्यासाठी ही अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानुसार आता 02 मे 2022 रोजी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांनी सुद्धा राज्यातील MBBS झालेल्या विद्यार्थ्यांसंबंधी निर्णय घेऊन एक परिपत्रक जारी केलं आहे.
काय आहे आरोग्य विज्ञान विद्यापीठाचं परिपत्रक
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने दिनांक 02 मे 2022 रोजी निर्णय घेऊन यापुढे राज्यातील MBBS कोर्स पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना त्याच महाविद्यालयाशी संलग्नित असलेल्या रुग्णालयातच इंटर्नशिप करावी लागणार आहे. यापुढे कुठल्याही विद्यार्थ्यांना महाविद्यालय सोडून पर जिल्ह्यात किंवा पर राज्यात इंटर्नशिप करण्यास मुभा नसेल. यामुळे विद्यार्थ्यांनाही फायदा होईल व संबंधित रुग्णालयातील रुग्णांना चांगली सेवाही मिळणार आहे.
या आधी काय होता नियम..?
या आधी वैद्यकीय विद्यार्थ्यांना MBBSची साडे चार वर्षे महाविद्यालयात शिक्षण घेतल्यावर कुठल्याही महाविद्यालयात किंवा रुग्णालयात बदली मिळत असे. तर काहींना आंतरजिल्हा किंवा आंतरराज्य रुग्णालयात आंतरवासिता करण्याची मुभा मिळायची. यामुळे संबंधित महाविद्यालयाच्या रुग्णालयात कामकाजासाठी व रुग्णांना सेवा देण्यासाठी कनिष्ठ व शिकवू डॉक्टरांची कमतरता भासायची. आता मात्र या नवीन नियमांमुळे प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालयात रुग्णांना चांगली सेवा मिळणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. यानिर्णयामुळे आता MBBS झाल्यावर विद्यार्थ्यांना त्याच महाविद्यालयात करावा लागणार आंतरवासिता कार्यकाळ पूर्ण करावा लागणार आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI