'ठुमकत नाचणारा मोर अन् वन्समोअर, वन्समोअर...' बालभारतीच्या पुस्तकातच मराठीचे वाभाडे
Mumbai : इयत्ता पहिलीच्या बालभारती पुस्तकातील एका कवितेवर सध्या वाचक वर्गातून बराच संताप व्यक्त केला जात आहे.
Mumbai : काही महिन्यांपूर्वी शालेय शिक्षणात मराठी भाषेचं (Marathi Language) शिक्षण देणं हा राज्य शासनाकडून अनिवार्य करण्यात आलं आहे. मराठी भाषेचं शिक्षण न देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्यात येईल असंही शासनाकडून सांगण्यात आलं आहे. ही सक्ती असतानाचा दुसरीकडे बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकातील एक कविता सध्या बरीच चर्चेत आलीये. या मराठीच्या कवितेत वापरण्यात आलेल्या मराठी भाषेवर सध्या तीव्र संपात व्यक्त केला जातोय.
इयत्ता पहिल्या बालभारती पुस्तकात ही कविता आहे. 'जंगलात ठरली मैफल' असं या कवितेचं नाव आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्त निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून इयत्ता पहिली ते सातवीची पुस्तकं प्रकाशित करण्यात येतात. याच मंडळाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या मराठीच्या पुस्तकात मराठीचे वाभाडे काढणारी ही कविता आहे.
कविता नेमकी काय?
'जंगलात ठरली नाचगाण्याची मैफल
अस्वल म्हणालं, ही तर हत्तीची अक्कल,
तबल्यावर होती कोल्होबाची साथ
वाघोबा म्हणाले, नाही ना बात ?
पेटी मी किती वाजवतो सुंदर
हसत हसत म्हणाले साळींदर.
गुंडू-पांडू लांडग्यांना तंबोऱ्याची हौस
संतूर वाजवू म्हणाले चिकीमिकी माऊस !
मुंगीने लावला वरचा सां
आवाज आवाज ओरडला ससा.
ठुमकत नाचत आला मोर
वन्समोअर, वन्समोअर झाला शोर !
वाचक वर्गाचा संताप
ही कविता ऐकून सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणात संताप व्यक्त केला जातोय. रोहन नामजोशी या फेसबुक युजरने या कवितेसंदर्भात केलेली पोस्ट सध्या बरीच चर्चेत आलीये. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, मुळात ही कविता अतिशय भंगार आहे. ‘स्वप्नात पाहिली राणीची बाग’ या विंदांच्या कवितेला समोर ठेवून रचल्यासारखी वाटतेय. पहिल्या ओळीत लिहिलंय ही हत्तीची अक्कल.. बहुतेक सुबुद्धी म्हणायचं असेल कवयित्रीला. कारण वाचताना.. ही ही.. हत्तीची अक्क्ल असं वाटतंय (म्हणून बघा एकदा).
‘तबल्यावर होती कोल्होबाची साथ, वाघोबा म्हणाले नाही ना बात?’ म्हणजे. कहना क्या चाहते हो? म्हणजे नीट जमलं नाही असं म्हणायचं असेल. बात हिंदी शब्द हा भाग आणखी वेगळा. क्या बात है पूर्वी ताई. पुढे जाऊन आधुनिक दुर्बोध कवयित्री होणार तुम्ही. ‘संतूर वाजवू म्हणाले चिकी मिकी माऊस..’ मी एवढा हसलो ना या ओळीवर.. अबे काय आहे हे? ते लांडगे म्हणजे एक वर्षांच्या अंतराने झालेले जुळे भाऊ वाटताहेत. पान लावताना फक्त त्या चित्राचा साईज कमी केला आहे बहुतेक. मुंगीने लावला वरचा सां.... असा लागतो सां.. आवाज आवाज ओरडला ससा... हाहाहाहहाहाहाहहा.... अरे काय हे?'
पुढे त्यांनी म्हटलं की, 'पण खरं सांगायचं तर भावे बाईंची तरी काय चूक म्हणा. एक तर आपल्याकडे कवी- कवयित्री नाहीत. कवी आहेत म्हटल्यावर लोक त्यांची थट्टा करतात. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मराठीत काहीतरी लिहिणार म्हणजे कवयित्रीला मानधन देताना बालभारतीला फेफरे आले असणार. आपल्या दर्जेदार साहित्य हवं असतं पण दर्जेदार पैसे द्यायचे नसतात. मग तुमच्या वाट्याला हेच येणार. म्हणजे कमी पैसे घेतले म्हणजे घाण लिहायचं असा त्याचा अर्थ नाही. पण का लोक क्रिएटिव्ह होतील? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कवितेला मान्यता देणाऱ्यांची कीव येते. भावे बाई काही लिहितील, तुम्ही मान्य कसं करता? पुन्हा मामला तोच. जे नीट लिहितात किंवा लिहू पाहतात त्यांना नीट वागवायचं नाही, संधी द्यायची नाही, त्यांचा मान नाही धन त्याहून नाही. मग हेच तुमच्या पोरांना वाचायला लागणार.'
आपुल्याच घरात हाल सोसते मराठी?
मराठीसाठी आग्रही भूमिका धरणारे अनेक थोर माणसं महाराष्ट्रात होऊन गेलीत. पण मराठीची सुधारणा आतातरी झाली आहे का? असा प्रश्न अजूनही अधांतरीच आहे. त्यातच सध्या वाढणारं इंग्रजी शाळांचं प्रस्थ यामुळे आपुल्याच घरात मराठी हाल सोसतेय याची प्रचिती अगदी पावलोपावली अनेकांना येते. त्यामुळे शालेय जीवनाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना अशा प्रकारची मराठी शिकायला मिळणार का? असाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय. यावर आता राज्य शासन आणि शालेय शिक्षण विभाग काही पावलं उचलणार का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI