Wardha Crime : साडेआठ महिन्यांनी खुनाचं रहस्य उलगडलं, दोघांना अटक; 3 गायींची चोरी आणि पैशांच्या वादातून हत्या
Wardha Crime : वर्ध्यातील कारंजा पोलीस ठाण्यात साडे आठ महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला पथकाला यश आलं आहे. तीन गायींची चोरी आणि पैशांच्या वादातून ही हत्या झाली होती.
Wardha Crime : वर्धा (Wardha) जिल्ह्यातील कारंजा पोलीस ठाण्यात साडे आठ महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या खुनाच्या (Murder) गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (Crime Branch) पथकाला यश आलं आहे. डोरीलाल ऊर्फ राजू बन्सीलाल नागवंशी (रा. जरुड, ता. वरुड, जि. अमरावती) असे हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तीन गायींची (Cow) चोरी आणि पैशांच्या वादातून त्याची सावळी खुर्द येथील ओम नामदेव पठाडे (वय 36 वर्षे) आणि सुनील वामन ढोबाळे या दोघांनी हत्या केल्याचं समोर आलं आहे. या दोघांनाही अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वर्धा जिल्ह्यातील कारंजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती महामार्गावरील हेटीकुंडी फाट्याजवळ जवळपास साडेआठ महिन्यांपूर्वी अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता. वर्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावत दोन आरोपींना अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी तपासाची नवी रणनीती ठरवून सुरुवातीपासून तपासचक्र फिरवले असता साडेआठ महिन्यानंतर गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. तीन गायींची चोरी व पैशाच्या वादातून राजू बन्सीलाल नागवंशी याची हत्या करण्यात आली.
कसं उलगडलं हत्येचं रहस्य?
पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आणि योग्य पद्धतीने विचारणा केली असता ओम पठाडे त्याच्याकडील तीन गायी राजू नागवंशीने चोरील्या आणि त्या परस्पर विकल्या. शिवाय उसणे घेतलेले 14 हजार रुपये परत देण्यासाठी नकार देत होता. याचाच राग मनात धरुन नियोजनबद्धपणे हत्येचा कट रचण्यात आला. डोरीलाल याला दुचाकीने वर्धा जिल्ह्यात आणून त्याच्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करुन त्याची हत्या केली आणि घटनास्थळावरुन पोबारा केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली.
ओळख पटवण्यासाठी झाले कसोशीने प्रयत्न
30 मार्च 2022 रोजी नागपूर ते अमरावती महामार्गावरील हेटीकुंडी फाट्याजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची तक्रार कारंजा पोलिसांत आली होती. त्यावरुन 302 कलमान्वये गुन्हा नोंद करुन तपास सुरु होता. संबंधित गुन्ह्याचा समांतर तपास वर्धा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत झाला. मृताची ओळख पटवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने नागूपर शहर व ग्रामीण पोलीस ठाणे, अमरावती शहर, अमरावती ग्रामीण, भंडारा, गोंदिया तसेच मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथील स्थानिक पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष जाऊन हरवलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यात आली. आठ महिन्यांत सातत्याने मृताची ओळख पटवण्याकरता कसोशीने प्रयत्न झाले. परंतु, गुन्ह्यातील मृताची ओळख पटत नव्हती.
अशी पटली मृताची ओळख!
महामार्गावरील संपूर्ण हॉटेल, ढाबे, पेट्रोलपंप यांची तपासणी करुन तेथील फुटेज प्राप्त करुन त्यांचीदेखील पडताळणी केली. घटनास्थळाची आणि परिसराची पडताळणी करण्यात आली. आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या मिसिंगवर बारकाईने अभ्यास करण्यात आला. त्यानंतर समांतर तपासा दरम्यान कोंढाळी पोलीस ठाण्यात दाखल मिसिंगमधील हरवलेल्या इसमाचे वर्णन गुन्ह्यातील मृताच्या वर्णनाशी जुळले. त्यातील हरवलेला इसम डोरीलाल उर्फ राजू बन्सीलाल नागवंशीच्या नातेवाईक, मुलगा आणि त्याच्या पत्नी यांच्याकडे जाऊन चौकशी केली. संबंधित मृत व्यक्ती आपले वडील डोरीलाल उर्फ राजू नागवंशी असल्याचं मुलाने सांगितलं.
हत्या प्रकरणाची यांनी केली कार्यवाही!
पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, स्थानिक गुन्हे शाखेचे संजय गायकवाड, राजपुत, अमोल लगड, रणजित काकडे, राजेश तिवस्कर, विकास अवचट, प्रदीप वाघ, गोपाल बावणकर, अंकित जिभे यांच्यासह सर्व स्थानिक गुन्हे शाखा तसेच कारंजाचे पोलीस कर्मचारी कापटे यांनी केली आहे.