Vasai: एटीएम मशीनमधून पैसे काढून देण्याच्या बहाण्यानं एटीएम कार्डाची अदलाबदल; दोघांना अटक, आरोपींकडून दीड लाख रुपये जप्त
सीसीटीव्हीच्या आधारे तपास करुन पोलिसांनी साहिल शेख आणि सागर मंडल या दोन आरोपींना अटक केली आहे. या दोघांकडून दिड लाखांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.

वसई: एटीएम कार्डची (Atm Card) हेराफेरी करुन फसवणाऱ्या आरोपींना विरार पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. पैसे काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीला बोलण्यात गुंतवून त्याच्या अकाऊंटमधले 63 हजार रुपये आरोपींनी काढले. नालासोपारा पूर्वेकडील धानीवबाग तलावाजवळच्या एटीएममध्ये ही घटना घडली. सीसीटीव्हीच्या आधारे तपास करुन पोलिसांनी साहिल शेख आणि सागर मंडल या दोन आरोपींना अटक केली आहे. या दोघांकडून दीड लाखांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.
22 मार्चला पावणे आठच्या दरम्यान फिर्यादी रोहित राय हा नालासोपारा पूर्वेकडील धानीवबाग तलावाजवळील ए.टी.एम. सेंटर मधून पैसे काढण्यासाठी गेला होता. त्यावेळी दोघा अनोळखी इसमांनी आपसात संगनमत करुन ए.टी.एम. सेंटरमधून पैसे काढण्यात आलेल्या व्यक्तीला बोलण्यात गुंतवून ए.टी.एम. कार्डची अदलाबदल केली. त्याच्या ए.टी.एम. कार्ड मधून 44000 रुपये काढले. त्याच दिवशी दुसऱ्या एकाचे 19000 रुपये या चोरट्यांनी काढले होते.
विरारच्या गुन्हे शाखा तीनच्या युनिटने याचा तपास करताना सीसीटीवीच्या आधारे आरोपी साहील सलीम शेख आणि सागर अभिजीत मंडल या दोघांना अटक केली आहे. या दोघांकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटार सायकल, त्याचबरोबर दीड लाखाची रोख रक्कम ही पोलिसांनी हस्तगत केली आहे. दोघेही आरोपी मुंबईचे राहणारे आहेत. त्यांच्याकडून पेल्हार, तुळींज, ठाणे शहर आणि उत्तर प्रदेश येथील ही गुन्हे उघड झाले आहे. या चोरांचे इतर कोणी साथीदार आहेत का? आणि यांनी किती ठिकाणी चोरी केल्या? याचा तपास आता पोलीस करत आहेत. दरम्यान, नागरिकांनी एटीएमचा वापर करताना काळजीपूर्वक करावा, एटीएम कार्डसह त्याचा पीन नंबर कोणाला देखील कळू देऊ नये, असे आवाहन धुळे पोलिसांनी केले आहे.
ठाण्यात एटीएम कार्ड लंपास करणाऱ्या टोळीचा ठाण्यात पर्दाफाश
ठाणे खंडणी विरोधी पथकाने एटीएम कार्ड चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी विविध बँकांच्या एटीएम सेंटरमध्ये ग्राहकांना बोलण्यात गुंतवून त्यांचे एटीएम कार्ड अदलाबदल करून लंपास करत असे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींची एक विशिष्ट कार्यपद्धती होती. त्यांनी विविध बँकांचे डुप्लिकेट एटीएम कार्डस आधीच बनवून ठेवलेले असायचे. ठाणे जिल्ह्यातील शहरातील विविध शहरांत ते एटीएम सेंटर्समध्ये जात आपले सावज हेरायचे. मग त्यांना मदत करण्याचा बहाण्याने बोलण्यात गुंतवून त्यांचे ओरिजिनल एटीएम कार्डाशी आपल्याजवळचे डुप्लिकेट कार्ड अदला-बदली करायचे.बोलताना कार्डाचा पिन नंबरही सहज काढून घ्यायचे आणि तो ग्राहक बँकेतून गेल्यावर पुन्हा तात्काळ कार्डाचा वापर करून पैसे काढून पसार व्हायचे.























