Crime News : धक्कादायक! गोळीबार करून सासरच्या मंडळीने विवाहितेला संपवल्याचा आरोप, पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
Shahapur Crime News : विवाहितेचा छळ करून तिला संपवल्याच्या आरोपात तिच्या पतीसह सासरच्या सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहापूर, ठाणे : पतीसह सासरच्या मंडळीने विवाहितेचा छळ करून तिच्यावर बंदुकीतून गोळीबार करत तिला ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शहापूर (Shahapur) तालुक्यातील अजनुप ग्रामपंचायत हद्दीतील बोंडरपाडा येथील मृतक सासरी राहत असलेल्या घरात घडली आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या सहा जणांच्या विरोधात हत्येसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. रंजना शिवा भवर (वय 27) असे गोळीबारात ठार झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर पती शिवा भवर, सासू सावित्री भवर , सासरे काळू भवर , गजमल भवर , आत्या भवर, बेंडू भवर अशी गुन्हा दाखल झालेल्या सासरच्या सहा जणांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत रंजना शहापूर तालुक्यातील नांदगाव चिंचपाडा येथे राहणारी होती. तिचा विवाह शहापूर तालुक्यातील अजनुप ग्रामपंचायत हद्दीतील बोंडरपाडा येथील शिवा भवर याच्याशी 28 एप्रिल 2018 रोजी झाला. त्यानंतर वर्षभर सुखाचा संसार सुरू असतानाच आरोपी पती हा मृतक पत्नीला घर खर्चासाठी पैसे माहेर वरून घे असा असा तगादा लावत तिला मारहाण आणि शिवीगाळ करत होता. त्यातच विवाह झाल्यानंतर दोघांना दोन मुले झाली असून एक मुलगी साडेतीन वर्षाची आहे. तर मुलगा दीड वर्षाचा आहे. अशातच गुन्हा दाखल असलेली सासरच्या मंडळींचा अधिक छळ करीत असल्याने मृत रंजनाने 2022 मध्ये विष प्राशन केले होते. मात्र त्यावेळी तिच्यावर तातडीनं उपचार केल्याने ती बरी झाली होती. त्यानंतर दोन मुलांना घेऊन ती माहेरी राहत असल्याचे पाहून सासरच्या मंडळीने तिला पुन्हा समजूत काढून सासरी आणले होते.
मात्र, काही दिवसात पुन्हा सासरच्या मंडळीकडून विविध घरगुती कारणावरून तिचा छळ केला जात होता. त्यामुळे माहेरी फोन करून आई-वडील अथवा भावाला सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या छळाची माहिती रंजना देत होती. यामुळे सासरच्या मंडळींचे रंजनासोबत 19 सप्टेंबर रोजी रात्रीच्या 9.30 वाजल्याच्या सुमारास वाद झाला. सासरच्या मंडळींनी छऱ्याच्या बंदुकीने गोळ्या घालून रंजनाची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस ठाण्या अंर्तगत येणाऱ्या खर्डी पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनास्थळी पंचनामा करत रंजनाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयातून आज सकाळी मुंबईतील जे.जे. रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, मृतकाचा भाऊ पांढरी नवसू केवारी (वय 30) याच्या तक्रारीवरून तिच्या पतीसह सासरच्या सहा जणांच्या विरोधात 20 सप्टेंबर रोजी शहापूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 302, 498(अ ) 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधीक तपास पोलीस निरीक्षक अनंत पराड करीत असल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली आहे.