Yavatmal: शाळा प्रशासनाच्या त्रासाला कंटाळून मुख्याध्यापिकेची आत्महत्या; अध्यक्ष, सचिवास चौघांवर गुन्हा दाखल
Crime News: यवतमाळमध्ये धक्कादायक घटना घडली आहे, शाळा प्रशासनाच्या त्रासाला कंटाळून मुख्याध्यापिकेने आत्महत्या केली आहे.
यवतमाळ: सेवानिवृत्तच्या केसवर सही करणार नाही, म्हणून मानसिक त्रास आणि वारंवार अपमानित करण्यात येत असल्याने मुख्याध्यापिकेने गळफास (Yavatmal Principal Suicide) लावून आत्महत्या केल्याची घटना यवतमाळमध्ये (Yavatmal) घडली. भांब राजा येथील नेहरू महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिकेने हे टोकाचं पाऊल उचललं. यानंतर विद्यालयाचे अध्यक्ष आणि सचिवासह चौघांवर गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर विद्यार्थी आणि पालकवर्ग तसेच या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शाळेचे अध्यक्ष, सचिवासह चौघांवर गुन्हा दाखल
या प्रकरणी मृत मुख्याध्यापिकेच्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन यवतमाळच्या लोहारा पोलीस ठाण्यात (Lohara Police Station) भांब राजा येथील नेहरू महाविद्यालयाच्या अध्यक्ष, सचिवासह चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मंगला रमेश ढवळे असं मृत मुख्याध्यापिकेचं नाव आहे. तर अध्यक्ष किसन जयस्वाल, सचिव निलेश चव्हाण, लिपिक अक्षय जयस्वाल आणि सहाय्यक शिक्षक अरुण जाधव अशी गुन्हा नोंद करण्यात आलेल्या चौघांची नावं आहेत.
मुलगी मोनिका चंदनखेडे (रा. विश्वकर्मा नगर, नागपूर) हिने यवतमाळच्या लोहारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर प्रकरणातील दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्याध्यापिका 26 वर्षांपासून होत्या शाळेत कार्यरत
मृतक मुख्याध्यापिका मंगला ढवळे या भांबराजा येथील नेहरू महाविद्यालयात सन 1997 पासून शिक्षक पदावर कार्यरत होत्या. तर, 2018 पासून त्या विद्यालयात मुख्याध्यापिका पदावर कार्यरत होत्या. तर मंगला ढवळे या 31 ऑगस्ट 2023 रोजी सेवानिवृत्त होणार होत्या.
नेमकं घडलं काय?
मुख्याध्यापिका मंगला ढवळे यांनी महाविद्यालयातील लिपिक अक्षय जयस्वाल याला 15 एप्रिल 2023 रोजी 50 हजार रुपये उसनेवारी दिले होते, त्यापैकी 40 हजार रुपये त्याने मुख्याध्यापिका मंगला ढवळे यांना परत दिले. मात्र उर्वरित 10 हजार रुपये देण्यासाठी तो आज देतो, उद्या देतो म्हणून पैसे देणं टाळू लागला. त्याला पैसे परत मागितले असता तो मुख्याध्यापिकेला अपमानित करत होता. तर, महाविद्यालयातील सचिव निलेश चव्हाण आणि अध्यक्ष किसन जयस्वाल हे मुख्याध्यापिका मंगला ढवळे यांच्या सेवानिवृत्तीच्या फाईलवर सह्या करण्यास तयार नव्हते. आम्ही तुमच्या पेन्शन केसवर सही करणार नाही. असं म्हणत हे सगळे मुख्याध्यापिकेला मानसिक त्रास देऊ लागले. याच त्रासाला कंटाळून मुख्याध्यापिका मंगला ढवळेंनी आत्महत्या केली.
हेही वाचा: