Crime News : धक्कादायक! चॉकलेटचे आमिष दाखवून अहमदनगरमध्ये सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार
Amadnagar News Update : सात वर्षीय मुलीला पाणीपुरी, चॉकलेट आणि चिप्सचे आमिष दाखवून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली आहे.
अहमदनगर : अंगणात खेळणार्या सात वर्षीय मुलीला पाणीपुरी, चॉकलेट आणि चिप्सचे आमिष दाखवून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. पीडित मुलीच्या आईने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून युसूफ हमीद कुरेशी याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युसूफ कुरेशीला अहमदनगरच्या कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई मोलमजुरीचे काम करते. युसूफ कुरेशी हा नराधम तिला तीन ते चार दिवसांपासून पाणीपुरी, चॉकलेट, चिप्स देत होता. गणेश चतुर्थीनिमित्त शाळेला सुट्टी असल्याने पीडीत मुलगी घरीच होती. पीडितेची आई कामावर गेल्याची संधी साधून युसूफने मुलीला दुचाकीवरून एका मंगलकार्यालयात घेऊन गेला. त्यानंतर या नराधमाने मुलीवर अत्याचार केले. याबाबत मुलीच्या आईला समजताच त्यांनी तातडीने नातेवाईकांशी संपर्क केला. मुलीच्या आईने चाईल्ड लाईन संस्थेला देखील याबद्दल माहिती दिली.
चाईल्ड लाईनमधील अधिकार्यांच्या मदतीने पीडितेच्या आईने पोलिसांत फिर्याद दिली आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच युसूफ कुरेशी हा शहरातून पसार होण्याच्या तयारीत असताना कोतवाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेसंदर्भात नाशिक येथील प्रयोगशाळेच्या पथकाला पाचारण करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे. याबाबत सखोल तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक पाटील यांनी दिले आहेत.
पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात कलम 376, 376 (2) (आय) (जे), 376 (अब), 377, 354 (ब), 363, 506 सह बाललैंगिक अत्याचार कायदा 2012 चे कलम 3,4,7,8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून आवाहन
या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. अनोळखी व्यक्तिंपासून आपल्या लहान मुलांना खाण्याचे आमिष दाखवून जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल तर मुलांना सावधान करावे. याबाबत त्यांना वेळोवेळी समज द्यावी असे आवाहन कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी केले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर अहमदनगर शहरात पालकांमध्ये घबराट पसरली आहे. लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळेतूनही लहान मुलांना गुड टच बॅड टच बाबत माहिती देणं गरजेचं असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केलं आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास मनोज महाजन हे करीत आहेत.
महत्वाच्या बातम्या