अमरावती जिल्हा पुन्हा हादरला! सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार, चार दिवसातील दुसरी घटना
अमरावती जिल्ह्यात मागील चार दिवसात दोन अत्याचाराच्या घटना घडल्या आहे. सात वर्षांच्या मुलीवर बलात्कारची घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वीच बलात्कारातून गर्भवती राहिल्याने एका मुलीने आत्महत्या केलीय.
अमरावती : जिल्ह्यातील रहीमापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वनोजा गावात राहणाऱ्या सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर गावातीलच वीस वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने पुन्हा अमरावती जिल्हा हादरला आहे. दोन दिवसांपूर्वीच अमरावतीच्या येवदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याने ती गर्भवती राहिली होती. यातूनच 29 ऑगस्टला तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.
अंजनगाव तालुक्यातील दोन ते तीन हजार वस्तीच्या गावात एक कुटुंब राहत होते. 11 सप्टेंबर रोजी सकाळी हे कुटुंब आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात शेतमजुरीचे कामासाठी गेले होते. आपल्या लहान मुलगा-मुलीला आजी-आजोबांकडे घरीच थांबून ठेवले होते. पीडित मुलगी शौचालयासाठी गावातील लेंडी नाल्याच्या बाजूला जात होती. त्याच रस्त्यावरून शेतात जाणारा शिवम प्रदीप पातोंड याने आपण शेतात गवताला जाऊ असे म्हणून आरोपीने पीडित मुलीला आपल्या दुचाकीवर बसून काही अंतरावर असलेल्या कपाशीच्या शेतात नेले. इथं निंबाच्या झाडाखाली मुलीवर अत्याचार केला. पीडित मुलीचे आई वडील शेतातून घरी आले असता आपली मुलगी रडत असल्याची दिसली. यावेळी विचारले असता तिने घडलेली घटना सांगितले. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
दोन दिवसापूर्वीच एका पीडितेने केली होती आत्महत्या
अमरावती जिल्ह्यातील येवदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीवर गावातीलच एका युवकाने बलात्कार केला होता. यामध्ये युवतीला गर्भधारणा झाली. सात महिन्यांची गर्भवती असताना युवतीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी युवतीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी युवकाविरुद्ध बलात्कारासह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
दर्यापूर तालुक्याच्या येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात सतरा वर्षीय मुलीवर गावातीलच एका युवकाने जबरीने बलात्कार केला होता. ही घटना जानेवारी ते ऑगस्ट 2021 या काळात घडली आहे. यातूनच युवतीला गर्भधारणा झाली होती. दरम्यान युवती सात महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती मिळताच तिलाही धक्का बसला. यातूनच युवतीने 29 ऑगस्टला आत्महत्या केली होती. या प्रकरणी येवदा पोलिसांनी 29 ऑगस्टला आकस्मिक मृत्यूची नोंद करुन प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. दरम्यान 29 ऑगस्टला मृत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी येवदा पोलिसांत गावातीलच एका युवकाविरुद्ध तक्रार केली. त्यांनी तक्रारीत नमूद केले की, त्या युवकानेच मुलीवर जबरीने बलात्कार केला होता. यातूनच तिला गर्भधारणा झाली आणि त्या धक्क्यामुळेच तिने आत्महत्या केली. मुलीच्या गर्भधारणेसाठी आणि तिच्या आत्महत्येसाठी संबधित युवकच जबाबदार असल्याचे तक्रारीत नमूद केले. या तक्रारीवरून पोस्को, बलात्कार तसेच आत्महत्येसाठी अपप्रेरणा देणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संशयित युवकाला अटक केली असल्याची माहिती येवदाचे ठाणेदार अमूल बच्छाव यांनी दिली.