पुण्यातील मोक्का टोळीच्या मुसक्या आवळल्या, गावठी कट्टा, कत्तीसह धाराशिवमध्ये तिघांना अटक
पुणे जिल्ह्यातील मोक्का टोळीचा प्रमुख विनोद शिवाजी जामदरे व त्याचे इतर साथीदार येरमाळा परीसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती धाराशिवच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.
धाराशिव : पुणे जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी पोलिसांसमोर मोठं आव्हान बनलं आहे. खून, दरोडे, मारामाऱ्या आणि गँगवारमुळे पुण्यातील (Pune) कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच, दोन दिवसांपूर्वी बड्या उद्योगपतीच्या अल्पवयीन मुलाने दारु पिऊन भरधाव वेगाने कार चालवत दोन निष्पाप तरुणाईचा जीव घेतला. पुण्यातील या अपघातामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे, त्यातच दुसरकडी पुण्यातील जिल्ह्यातील दरोडखोरांना धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात अटक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. धाराशिव पोलिसांनी ही कारवाई केली असून तीन जणांना अटकही करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील मोक्का टोळीचा प्रमुख विनोद शिवाजी जामदरे व त्याचे इतर साथीदार येरमाळा परीसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती धाराशिवच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येरमाळा परीसरात रात्रीची गस्त सुरू केली होती. दरम्यान, सोमवारी रात्रीच्या सुमारास धुळे-सोलापूर महामार्गावर चोराखळी गावाजवळील हॉटेल कामतजवळ 5 जण संशयीत आढळून आल्याने गस्तवरील पोलिसांनी चौकशी केली. पोलिसांकडून सखोलपणे विचारपूस होत असल्याचे लक्षात येताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, रात्रीच्या अंधारात पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलागत करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
धाराशिव पोलिसांनी पाठलाग करुन पाच पैकी तीन आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडी साहित्याची बारकाईने पाहणी केली असता गावठी पिस्तुल,एक कत्ती,एक कटावणी आढळून आली. दरम्यान, पोलिसांच्या गुन्हे पथकाने पकडलेली ही टोळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची खात्री झाल्यानंतर तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या टोळीत एकूण 5 जण होते, येरमाळा परिसरात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नाता असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. यावेळी, दोघांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढला. मात्र, तिघांना अटक करण्यात आली असून तिघांच्या तपासातून इतर दोन्ही आरोपींचा देखील पोलिसांनी शोध सुरू केला आहे.