Pune Accident : वर्क फ्रॉम होममुळे कंटाळलेल्या अश्विनीला आई म्हणाली, जरा बाहेर फिरून ये; तेच निमित्त झालं अन् काळाने घाला घातला
Pune Porsche Car Accident : पुणे अपघातात मृत्यू झालेल्या अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोघांच्या कुटुंबीयांवर मोठं दुःख कोसळलं आहे.
पुणे : मृत्यूने गाठायचंच ठरवलं असलं तर तो गाठतोच, मग त्यासाठी एखादं क्षुल्लक कारणही निमित्त ठरू शकतं. असाच काहीसा अनुभव हा पुणे अपघातात जीव गमावलेल्या अश्विनी कोस्टा (Ashwini Costa) आणि अनिश अवधिया या दोघांच्या बाबतीत आल्याचं दिसतंय. सततच्या वर्क फ्रॉम होममुळे कंटाळलेल्या अश्विनीला तिच्या आईने बाहेर जाऊन फिरून ये, रिफ्रेश वाटेल असा सल्ला दिला आणि बाहेर गेलेल्या अश्विनीला काळाने गाठलं. पुण्यातील बड्या उद्योगपतीच्या मुलाने दारूच्या नशेत गाडी सुसाट नेली आणि त्यामध्ये अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया यांचा मृत्यू झाला.
वर्क फ्रॉम होममुळे कंटाळली
मूळची मध्य प्रदेशातील जबलपूरची असलेली अश्विनी कोस्टा ही पुण्यातील आयटी कंपनीत काम करत होती. त्या कंपनीचे वर्क फ्रॉम होम सुरू असल्याने सतत घरात बसून अश्विनी चांगलीच कंटाळली होती. तिच्या आईशीदेखील तिने चर्चा केली. त्यावर तिच्या आईने बाहेर फिरून ये, फ्रेश वाटेल असा सल्ला दिला.
अश्विनी कोस्टा ही शनिवारी तिच्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी पबमध्ये गेली होती. पार्टी झाल्यानंतर ती आणि तिचे मित्र बराच वेळ पबच्या बाहेर चर्चा करत होते. खीप उशीर झाल्यानंतर सगळे आपापल्या घरी निघाले. त्यावेळी अनिशने अश्विनीला तिच्या रूमवर सोडतो असं सांगत बाईकवर बसवले.
भरधाव वेगात आलेल्या कारने उडवलं
अनिशने बाईस स्टार्ट केली आणि समोरचा रस्ता क्रॉस करायला गेला, तितक्यात त्यांचा काळ बनून आलेल्या त्या आलिशान पोर्शे कारने त्यांचा जीव घेतला. ती कार इतक्या वेगात होती की बाईकवर बसलेली अश्विनी ही कितीतरी फूट उंच उडाली, त्यातच तिचा जागेवरच मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या अनिशचा थोड्या वेळात मृत्यू झाला.
ही बातमी समजताच अश्विनीच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला. कधीही बाहेर न पडणारी अश्विनी काहीतरी निमित्त झालं म्हणून बाहेर पडली आणि तिचा जीव गेला.
वेदांत अग्रवाल हा बड्या बापाचा मुलगा, बारावीच्या परीक्षेचा निकाल सेलिब्रेट करण्यासाठी पबमध्ये गेला. अल्पवयीन असतानाही त्याने दारू प्यायली, 48,000 रुपयांचं बिलही भरलं. दारूच्या नशेतच त्याने गाडी भरधाव वेगाने नेली आणि काहीही चूक नसणाऱ्या दोघांना उडवलं.
वेदांत अग्रवालला अटक केल्यानंतरही जेलमध्ये रॉयल ट्रीटमेंमट मिळाल्याचं समोर आलं. इतकंच काय तर अटक झाल्यानंतर फक्त 15 तासांमध्ये त्याला जामीन मिळाला.
विशाल अग्रवाल यांना अटक
पुण्यात भरधाव वेगात गाडी चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या मुलाचे वडील आणि बांधकाम व्यायवसायिक विशाल अग्रवाल यांना पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली. जी.एम प्लाझा लॉजिंग अँड रेस्टॉरंटमधून पुण्याचे उद्योजक विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली. विशाल अग्रवालसह ड्रायव्हर आणि अन्य एक व्यक्तीलाही अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या ड्रायव्हरचं नाव चत्रभूज डोळस असं आहे तर दुसरा व्यक्ती राकेश पौडवाललाही अटक करण्यात आली. तसचं या प्रकरणात कोझी बार मालक प्रल्हाद भुतडा यांच्यासह दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान अग्रवाल अत्यंत साध्या हॉटेलमध्ये थांबल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे या कोणाकडेही मोबाईल नव्हता.
ही बातमी वाचा: