Nalasopara News : हा कसला मुजोरपणा... झाड का तोडले? जाब विचारल्याने 70 वर्षीय वृद्धाला मारहाण; नालासोपारामधील घटना
Nalasopara Crime News : सोसायटीच्या आवारात असलेली झाडे का तोडली असा सवाल करणाऱ्या 70 वृद्धाला बेदम मारहाण करण्यात आली.
नालासोपारा, पालघर : झाड का तोडले..? असा जाब विचारल्याने संतप्त झालेल्या तिघांनी एका 70 वर्षीय वृद्धाला बेदम (Old Man beaten) मारहाण केली आहे. मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाली आहे. जखमी वृद्धावर उपचार सुरू असून या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती आहे. या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे.
नालासोपारा पश्चिम (Nalasopara West) येथील यशवंत एम्पायर सोसायटीच्या नवव्या मजल्यावरील रहिवासी मधाजी नागरे यांना मारहाण करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या दरम्यान दुकान मालकाकडे त्यांच्या इमारतीखाली लावलेली दोन झाडे का तोडल्याची माहिती घेण्यासाठी ते गेले होते. यावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्या दुकानात असलेल्या तीन जणांनी आजोबांना अमानुषपणे मारहाण केली.
या मारहाणीची संपूर्ण घटना इमारतीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या फुटेजमध्ये तीन जणांनी आजोबांना मोठ्या निर्दयीपणे मारहाण केलेली दिसून आहे. या तिघांनी त्यांना उचलून खाली फेकले, हे स्पष्ट दिसत आहे. तरुणांनी केलेल्या या मारहाणीत आजोबा गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर नालासोपाराच्या ओझोन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. उपचार सुरु असल्याने अजून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
कल्याण - डोंबिवलीत महिलांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
डोंबिवलीमध्ये (Dombivali) भर दिवसा महिलेवर अतिप्रंसग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीये. तर या चोरट्याने महिलेचं मंगळसूत्र देखील चोरल्याचं समोर आलंय. दरम्यान या प्रकरणी डोंबिवली टिळकनगर पोलिसांनी महिलेची तक्रार दाखल करुन घेत आरोपीचा शोध सुरु करण्यात आला आहे. तर या घटनेमुळे महिलांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे अशा लोकांवर जरब बसवण्यासाठी पोलीस प्रशासन कोणती पावलं उचणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पोलिसांकडून सध्या आरोपीची शोध घेणं सुरु आहे. तर पुढील तपास देखील करण्यात येतोय. त्यामुळे हा आरोपी सापडणार का की आणखी एखाद्या महिलेवर पुन्हा असाच प्रसंग ओढावणार हे पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे महिलांनी देखील काळजी घेण्याचं आवाहन सध्या कल्याण डोंबिवली प्रशासनाकडून करण्यात येत आहे.