वसई, विरारमध्ये बोगस पॅथॉलॉजी लॅबचा सुळसुळाट, रुग्णांच्या आरोग्याशी खेळ, पालिकेची नोटीस मिळाल्यावरही बिनधास्त?
Vasai Virar News : येथील रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले असून पालिका मोठी घटना होण्याची वाट पाहत आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
Maharashtra News : नांदेड (Nanded), संभाजीनगर (Sambhaji Nagar), नाशिक (Nashik), कळवा (Kalva) येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये रुग्ण दगावण्याच्या घटना समोर येत असतानाच आता वसई, विरार शहरात पॅथॉलॉजी लॅबचा गोरखधंदा समोर आला आहे. महत्त्वाचं म्हणजे येथील पाच बोगस पॅथॉलॉजी लॅब बंद करण्याची पालिकेने नोटीस देऊनही या बिनधास्तपणे सुरु असल्याच दिसून येत आहे.
बोगस पॅथॉलॉजी लॅबचे कारनामे सुरूच
वसई-विरार पालिका क्षेत्रात अनधिकृत इमारती, मान्यता नसलेल्या अनधिकृत शाळा, बोगस 'डॉक्टरांपाठोपाठ आता बोगस पॅथॉलॉजी लॅबचे कारनामे समोर आले आहेत. वसई विरार मधील पाच लॅबना वसई विरार शहर महानगरपालिकेने बंद करण्याच्या नोटीस दिल्या आहेत. तरीही यातील बहुतेक लॅब बिनधास्तपणे सुरु आहेत. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने वैद्यकीय सेवेचा परवाना रद्द केला असतानाही गुजरातचा डॉक्टर राजेश सोनीहा या पाच लॅबमधील रक्त, मलमूत्र तपासणीच्या रिपोर्टवर बिनदिक्कत सह्या करत होता. याबाबातच्या तक्रारी पालिकेला प्राप्त झाल्यानंतर पालिकेने श्री जी पॅथोलॉजी लॅब, पार्थ डायग्नोस्टिक सेंटर, गेटवेल क्लिनिकल लॅबोरेटरीज, ग्लोबल केअर अँण्ड वेल्फेअर डायग्नोस्टिक सेंटर, श्री धन्वंतरी पॅथोलॉजी लॅबोरेटरीज या पाच पॅथॉलॉजी लॅबला बंद करण्याची नोटीस दिल्या. मात्र कारवाई काहीच केली नाही त्यामुळे आजही त्या लॅब बिनधास्तपणे सुरु आहेत.
केवळ सोपस्कार म्हणून नोटीस?
या अशा लॅबमुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात असतानाही पालिकेने केवळ सोपस्कार म्हणून नोटीसा धाडल्या आहेत. मात्र वास्तव बघितल्यावर यातील बहुतेक लॅब चालू आहेत. डॉ. सोनीच्या ऐवजी दुस-या डॉक्टर ही या लॅबने ठेवल्या आहेत. एका लॅब चालकाने तर लॅबची परवानगी मागणारे लेटर पालिकेला देवून, त्याची रिसीव कॉपी घेवून, बिनधास्तपणे लॅब चालू केली आहे. रिसीव कॉपी म्हणजे पालिकेची परवानगी असल्याची माहीती या लॅब चालकाने एबीपी माझाशी बोलताना दिली.
आजाराचे निदान करणारे खोटे रिपोर्ट
आजाराचे निदान करणारे रिपोर्टच लॅबमधून बनावट बनवले जात असल्याने रुग्णांच्या आरोग्याशी खेळ मांडला आहे. वसई विरारची लोकसंख्या 25 लाख आहे. तसेच वसई, विरार शहरात दीडशेहून अधिक पॅथॉलॉजी लॅब आहेत. पालिकेने अशा प्रयोगशाळांना केवळ नोटीस पाठविण्यापलीकडे काहीही कारवाई केली नसल्याने रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिका मोठी घटना होण्याची वाट पाहत आहे का असा सवाल आता उपस्थित होत आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :
Monsoon and Weather update : महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु; हवामान विभागाची माहिती