Nilesh Ghaiwal Attack: पैलवानाने सणकन निलेश घायवळच्या कानाखाली मारली अन् हलगीचा आवाज थांबला, VIDEO व्हायरल
Pune Crime news: कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर हल्ला झाला होता. जत्रेतील कुस्ती स्पर्धेत एका पैलवानाने निलेश घायवळ याच्या अंगावर धावून जात त्याच्या कानाखाली मारली होती.

पुणे: काही दिवसांपूर्वी धारशिव जिल्ह्यातील एका कुस्ती स्पर्धेवेळी पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याला मारहाण झाली होती. भूम तालुक्यातील आंदरूड गावात ही घटना घडली होती. ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्ताने याठिकाणी कुस्ती भरवण्यात आली होती. त्यावेळी निलेश घायवळ हा आयोजकांसोबत मैदानात जाऊन स्पर्धकांना भेटत होता. त्यावेळी एका तरुणाने निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) याच्यावर हल्ला केला होता. या घटनेचा आणखी एक व्हिडीओ आता समोर आला आहे. निलेश घायवळला मारहाण करणाऱ्या तरुणाचे नाव सागर मोहोळकर (Sagar Moholkar) असल्याचे समोर आले होते.
सागर मोहोळकर हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. तो अहिल्यानगर जिल्ह्यातील नानज गावचा रहिवासी आहे. तो पेशाने पहिलवान असून शुक्रवारी रात्री तो धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील आंदरुड गावच्या जत्रेला उपस्थित होता. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत निलेश घायवळ हा आयोजकांसोबत मैदानात चालताना दिसत आहेत. त्यांच्यापुढे हलगी वाजवणारे चालत आहेत. मैदानात फेरी मारत असताना काळ्या रंगाच्या शर्टातील उंचपुरा सागर मोहोळकर हा निलेश घायवळच्या दिशेने चालत येताना दिसत आहे. निलेश घायवळच्या जवळ आल्यानंतर सागर मोहोळकर याने अगदी समोरुन जोरात घायवळच्या कानाखाली मारल्याचे दिसत आहे. सागर मोहोळकरने घायवळच्या कानाखाली मारल्यानंतर थोड्यावेळ सगळ्यांनाच काही समजेनासे झाले होते. सागर मोहोळकर हा निलेश घायवळला आणखी मारण्यासाठी अंगावर धावून गेला. मात्र, निलेश घायवळ याच्या टोळीतील त्याचे समर्थक लगेच मदतीसाठी धावून आले होते. या सगळ्यांनी सागर मोहोळकर याला पकडून चांगलाच चोप दिला होता. मात्र, पुण्यातील गुन्हेगारी विश्वात दबदबा असलेल्या निलेश घायवळला अशाप्रकारे मारहाण झाल्यामुळे सर्वत्र त्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, या घटनेनंतर वाशी पोलिसांनी सागर मोहोळकर याच्यावर पोलिसांसमोरच हाणामारी करुन गोंधळ घालण्याचा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
कोण आहे निलेश घायवळ?
निलेश घायवळ हा कुख्यात गुंड गजा मारणेच्या टोळीत काम करायचा. पुण्यातील कोथरुड परिसरातील सुतारवाडीत निलेश घायवळची मोठी दहशत होती. मात्र, गजा मारणे याच्याशी बिनसल्यावर मारणे गँगने घायवळवर दोनदा हल्ले केले होते. दत्तवाडीत गुंड सचिन कुडलेची निलेश घायवळ आणि साथीदारांनी रस्त्यात पाठलाग करुन फिल्मी स्टाईलने हत्या केली होती. कुडलेच्या हत्येनंतर घायवळसह 26 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली. 2019 मध्ये निलेश घायवळ तुरुंगातून सुटला होता. बाकी गुन्ह्यातदेखील घायवळला जामीन मिळाला आणि 2023 मध्ये तो अखेर तुरुंगातून बाहेर आला.
निलेश घायवळ याच्यावर मोक्का, खुन, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, खंडणी, दरोडा, गर्दी जमवून दंगा करणे, गंभीर दुखापत करणे, मारामारी असे गंभीर स्वरुपाचे एकूण 10 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. मध्यंतरी निलेश घायवळ व त्याच्या साथीदारांविरुद्ध भिगवण पोलीस स्टेशनला अपहरण खंडणीचा गुन्हा दाखल झालेला होता.
आणखी वाचा
निलेश घायवळच्या कानाखाली जाळ काढणाऱ्या पैलवानाचं नाव समोर आलं, तो तरुण कोण?
























