Nilesh Ghaiwal Attack: निलेश घायवळच्या कानाखाली जाळ काढणाऱ्या पैलवानाचं नाव समोर आलं, तो तरुण कोण?
Dharashiv Crime News: पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळला कुस्ती स्पर्धेत मारहाण, पैलवान अंगावर धावून गेला. या तरुणाने निलेश घायवळच्या कानाखाली मारल्याने एकच खळबळ

पुणे: पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारी क्षेत्रात दबदबा असणारा कुख्यात गुंड निलेश घायवळ याला शुक्रवारी मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. भूम तालुक्यातील आंदरूड गावात यात्रेनिमित्त भरवलेल्या कुस्ती स्पर्धेत हा प्रकार घडला. आंदरूड येथील ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त ही स्पर्धा भरवण्यात आली होती. निलेश घायवळ (Nilesh Ghaiwal) यानेच ही स्पर्धा आयोजित केली होती. शुक्रवारी रात्री कुस्ती सुरु असताना निलेश घायवळ हा पैलवानांना भेटण्यासाठी कुस्तीच्या फडात आला होता. त्यावेळी तिथे उभ्या असणाऱ्या एका तरुण पैलवानाने निलेश घायवळच्या कानशिलात लगावली होती. यानंतर कुस्तीच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला होता. पैलवानाने निलेश घायवळ याला मारल्यानंतर त्याचे सहकारी मदतीला धावून आले होते. त्याने संबंधित पैलवानाला चोप दिला. मात्र, या सगळ्या गोंधळात हा तरुण पैलवान घटनास्थळावरुन निसटला होता. त्यामुळे तो नेमका कोण होता, हे स्पष्ट होऊ शकले नव्हते.
काल रात्रीपासून पोलीस या तरुणाचा कसून शोध घेत होते. या तपासादरम्यान निलेश घायवळ याच्यासारख्या नामचीन गुंडाच्या अंगावर हात टाकणाऱ्या तरुणाचे नाव समोर आले आहे. सागर मोहोळकर असं हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. तो अहिल्यानगर जिल्ह्यातील नानज गावचा रहिवासी आहे. तो पेशाने पहिलवान असून शुक्रवारी रात्री तो धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील आंदरुड गावच्या जत्रेला उपस्थित होता. निलेश घायवळ हा फडातील पैलवानांना भेटत असताना सागर मोहोळकर हा गर्दीतून वाट काढत पुढे पोहोचला आणि त्याने थेट निलेश घायवळ याला मारहाण केली होती.
या घटनेनंतर वाशी पोलिसांनी सागर मोहोळकर याच्यावर पोलिसांसमोरच हाणामारी करुन गोंधळ घालण्याचा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र, सागर मोहळकर याने निलेश घायवळ याला मारहाण का केली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतु, निलेश घायवळ याच्यासारख्या दबदबा असलेल्या सागर मोहोळकरची सध्या धाराशिव आणि पुण्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
निलेश घायवळ याच्यावर मोक्का, खुन, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, खंडणी, दरोडा, गर्दी जमवून दंगा करणे, गंभीर दुखापत करणे, मारामारी असे गंभीर स्वरुपाचे एकूण 10 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. मध्यंतरी निलेश घायवळ व त्याच्या साथीदारांविरुद्ध भिगवण पोलीस स्टेशनला अपहरण खंडणीचा गुन्हा दाखल झालेला होता.
आणखी वाचा
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळला कुस्ती स्पर्धेत मारहाण, पैलवान अंगावर धावून गेला अन्...























