Nashik Crime: लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
Nashik Crime: लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून एकाच गल्लीत राहणाऱ्या दोन गटात जोरदार राडा झाल्याची घटना मालेगावमध्ये घडली आहे.

Nashik Crime: मालेगाव (Malegaon) शहरात लहान मुलांच्या भांडणातून दोन गटांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. वाद इतका चिघळला की त्याचे रुपांतर थेट गोळीबार व हाणामारीत झाले. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आयशानगर पोलीस ठाण्यात (Aishanagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली असून इतर आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मेहताब अली या संशयिताने लहान मुलांच्या किरकोळ वादाचा राग मनात धरत सुमारे 10 ते 12 जणांना सोबत घेत फिर्यादी लईक अहमद मोहम्मद कामील यांच्या घरासमोर हल्ला चढवला. संशयित मेहताब अलीने दोन्ही हातात पिस्तूल घेत फिर्यादीच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या, मात्र सुदैवाने फिर्यादी खाली बसल्याने तो थोडक्यात बचावला.
Nashik Crime: फिर्यादीच्या घरात घुसून तोडफोड
गोळीबारानंतर आरोपी व त्याच्या साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच फिर्यादीच्या घरात घुसून तोडफोड केली. हल्ल्यातील काही जणांच्या हातात दोन तलवारी असल्याचे साक्षीदारांनी सांगितले असून त्यांनी परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हाणामारीदरम्यान घराबाहेर उभी असलेली मोटरसायकल पाडून नुकसान करण्यात आले. तर काही चारचाकींचे देखील नुकसान करण्यात आले आहे. या गोंधळात फिर्यादीचा मोबाईल फोन व तब्बल 50,000 रुपये रोख रक्कम गायब झाल्याचेही समोर आले आहे.
Nashik Crime: मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात
घटनेनंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर मालेगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मुख्य आरोपी मेहताब अलीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी आयशानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
Nashik Crime: सुनील बागुलांच्या समर्थकावर गुन्हा दाखल
दरम्यान, भाजपचे सुनील बागुल यांच्या आणखी एक कट्टर समर्थकावर पंचवटीतील रासबिहारी-मेरी लिंकरोडवरील कोट्यवधी रुपयाच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा करून मूर्तिकार मालमत्ताधारकाला हत्यारांचा धाक दाखवून 57 लाख रुपयांची खंडणी उकळ्याच्या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिवसेनाप्रणीत श्रमिक रिक्षा चालक-मालक युनियनचे कार्याध्यक्ष भगवंत ऊर्फ बाळासाहेब पाठक याच्यावर म्हसरूळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे याच गुन्ह्यात सुनील बागुलांचा पुतण्या अजय व कट्टर समर्थक मामा राजवाडे यांचेही नाव नमूद आहे. अजय बागुल आणि मामा राजवाडे हे दोघे न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र बाळासाहेब पाठक आणि इतर बारा ते पंधरा जणांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, पाहा व्हिडीओ
आणखी वाचा


















