(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Crime News: मित्रासोबत फोनवर का बोलते, आईने विचारला जाब; अल्पवयीन मुलीची तरुणासोबत आत्महत्या
Nagpur Crime News : मुलासोबत फोनवर अधिक वेळ का बोलतेस असा आईने जाब विचारल्यानंतर एका अल्पवयीन मुलीने आपल्या मित्रासह आत्महत्या केली असल्याची घटना समोर आली आहे.
Nagpur Crime News: ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल आला आहे. मात्र, त्याचा वापर अभ्यासाऐवजी मित्र मैत्रिणींसह चॅटिंगसाठीच जास्त होत आहे. या चॅटिंगबाबत आई वडिलांनी टोकल्यास किशोरवयीन मुले टोकाचे पाऊल उचलण्यापासून ही धजावत नसल्याच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना नागपूर जिल्ह्यातील कामठीमध्ये घडली आहे. कथित मित्रासोबत फोनवर का बोलते याबद्दल आईने रागावल्यानंतर त्याच मित्रासोबत घरातून पळून गेलेल्या १६ वर्षीय मुलीचा मृतदेह तिच्या १८ वर्षीय मित्रासह रेल्वे रुळावर आढळून आला. अल्पवयीन मुलीने ८ मार्च रोजी घरातून पळ काढल्यानन्तर दोघांनी काल रात्री धावत्या रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
कामठीमधील जयभीम चौक परिसरात जवळ जवळ घर असलेले १८ वर्षीय तरुण आणि १६ वर्षीय तरुणी एकमेकांच्या प्रेमात होते. मोबाईलवरील चॅटिंगच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती. या दोघांनाही वडील नसल्यामुळे ते दोघे आपापल्या आईचे आधार होते. मोलमजुरी करून दोघांच्या आई शिक्षण पूर्ण करून चांगल्या नोकरीला लागतील अशी अपेक्षा बाळगून होत्या. मात्र, एकमेकांच्या प्रेमात असलेल्या या दोघांचे अभ्यासात मन लागत नव्हते. ऑनलाईन अभ्यासासाठी हातात मिळालेल्या मोबाईलचा जास्त वापर एकमेकांशी बोलण्यासाठी आणि चॅटिंगसाठी व्हायचा, अशी माहिती समोर आली.
आपली मुलगी सतत एका तरुणासोबत फोनवर बोलते हे हे लक्षात आल्यानंतर अल्पवयीन तरुणीला तिच्या आईने तिला अनेकदा टोकले. मात्र, आईच्या या बोलण्याकडे ती सतत दुर्लक्ष करायची. काही दिवसांपूर्वी तिच्या आईने तिला याच कारणाच्या संतापात तिला मारले. आपल्यावर कोणीही प्रेम करत नाही या रागातून तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तिने तिच्या मित्राशी संपर्क साधला. त्यानेही पळून जाण्यास होकार दिला. कुटुंबापासून लांब पळून गेले की आपले जीवन सुकर होईल, प्रेमात कोणतीही अडचण राहणार नाही या समजातून दोघांनी ८ मार्च रोजी घरातून कोणालाही न सांगता घरातून पळ काढला.
दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरु केला. मात्र, आसपास आणि जवळच्या मित्रांकडे चौकशी करूनही त्यांचा ठावठिकाणा लागला नसल्याचे अखेर त्यांच्या पालकांनी नवी कामठी पोलीस स्थानकात जाऊन तक्रार नोंदवली. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांनी पोलीस पथक रवाना केले. मात्र, गेले तीन चार दिवस दोघांचा शोध लागला नाही. दोघांनी त्यांचे मोबाईल बंद केल्यामुळे शोध कामात पोलिसांना अनेक अडचणी आल्या. शुक्रवारी रात्री पोलिसांना रेल्वे अधिकाऱ्यांकडून कंठी जवळून जाणाऱ्या अहमदाबाद - हावडा एक्प्रेस समोर दोघांनी हातात हात घेऊन उडी घेत आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. तरुणाची दुचाकी रेल्वे रुळाजवळ मिळाल्यामुळे कामठीमधील जयभीम चौक परिसरातून बेपत्ता असलेल्या त्या दोघांनी आत्महत्या केल्याची पोलिसांची शंका बळावली. या दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवली.
पहाटे पोलिसांच्या फोनने दोन्ही कुटुंबांना धक्का
आपले मुले पळून गेले असले तरी कुठे तरी ते जिवंत आहेत. राग कमी झाल्यावर ते परत येतील अशी आशा दोघांच्या कुटुंबियांना होती. त्यामुळे ८ मार्च पासून दोघे बेपत्ता असले तरी दोघांच्या कुटुंबियांकडून आशेने त्यांचा शोध कार्य केला जात होता. मात्र, शनिवारी पहाटे पोलिसांनी दोन्ही कुटुंबियांना रेल्वे रुळावर दोन मृतदेह आढळले असून तुम्ही ओळख करण्यासाठी या असे फोन केले. पोलिसांच्या या फोननंतर दोन्ही कुटुंबियांना धक्काच बसला. पोलिसांच्या ताब्यातील आपल्या पोटच्या लेकरांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत पाहून दोघांच्या कुटूंबियांनी हंबरडा फोडला.
मैत्रीला कुटुंबाचा विरोध अशा समजातून उचलला टोकाचा पाऊल
पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांनी दिलेल्या महितीनुसार दोघे ही एकाच परिसरातील राहणारे होते. त्यांच्या प्रेम प्रकरणाची कुणकुण कुटुंबियांना लागली होती, त्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये तणावाचे वातावरण होते. दोघांना कुटुंबामधून विरोधाला सामोरे जावे लागत असल्याने ८ मार्च रोजी हे प्रेमीयुगुल घरातून पळून गेले होते.
दोनच दिवसात कटू वास्तवाची जाणीव
घरातून पळून गेल्यावर दोनच दिवसात दोघांना आर्थिक अडचण जाणवायला लागली होती. जगात खिशा रिकामा असताना जगणे एवढे सोपे नाही याची दोघांना जाणीव झाली. घरी परत गेलो तर घरचे आपल्याला वेगळे करतील. सोबत राहता येणार नाही या भावनेतून दोघांनी आत्महत्येचा निर्णय केला असल्याचे म्हटले जात आहे. शुक्रवारी रात्री उशिरा धावत्या रेल्वेसमोर एकमेकांचा हात धरून आत्महत्या केली.