Mumbai : मुंबईतील दहिसरमध्ये कचऱ्यात बंदूक सापडली, 12 वर्षांच्या मुलानं खेळण्यातील बंदूक समजून ट्रिगर दाबताच हवेत गोळीबार, नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : मुंबईतील दहिसरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बारा वर्षांच्या मुलाला कचऱ्यात एक बंदूक सापडली. ती खेळण्यातली असल्याचं समजून त्यानं ट्रिगर दाबताच हवेत गोळीबार झाला.

मुंबई : मुंबईतील दहिसर पूर्वमधील वैशालीनगर पूर्वमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बारा वर्षाच्या मुलाकडून हवेत गोळीबार करण्यात आला. बारा वर्षाच्या एका मुलाला बंदूक कचऱ्यात पडलेली आढळून आली. त्यानं ती उचलली आणि खेळण्याची असावी असं समजून त्यानं ट्रिगर दाबताच हवेत गोळीबार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संबंधित मुलाची चौकशी करुन त्यानंतर अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. लोडेड बंदूक कचऱ्यात फेकणारा कोण व्यक्ती असावा याचा शोध देखील पोलिसांकडून घेतला जाणार आहे.
खेळण्यातील बंदूक समजून ट्रिगर दाबला अन्...
मुंबईच्या दहिसर पूर्वेत वैशालीनगर परिसरात गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. बारा वर्षाच्या मुलाकडून दहिसर मध्ये गोळीबार झाल्याचं समोर आलं. आज (27 जून) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास बारा वर्षाच्या मुलाकडून हवेत गोळीबार करण्यात आला. बारा वर्षाच्या एका मुलाला वैशाली नगर परिसरात खेळत असताना कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये बंदूक सापडली. या मुलांनी खेळण्याची बंदूक असावी असं समजून बंदुकीचा ट्रिगर दाबला आणि हवेत गोळीबार झाला.
सुदैवाने या गोळीबारामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून, गोळीबाराची माहिती मिळतच घटनास्थळी दहिसर पोलिसांनी धाव घेत संंबंधित मुलाला चौकशीसाठी आणि बंदूक ताब्यात घेतली होती. ही बंदूक कचऱ्यामध्ये काशी आली, या मुलाला कचरामध्ये खरंचं बंदूक भेटली. की त्यानं कुठून आणली होती या सर्व संदर्भात सखोल चौकशी दहिसर पोलीस करत होते. त्यानंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाला कचऱ्याच्या ढिगात एक पिस्टल सापडलं होतं.
दहिसर पोलिसांनी काय म्हटलं?
आज (27 जून) रोजी सुमारास दहिसर पोलीस यांना माहिती मिळाली की,साईकृपा चाळीच्या पूर्वेकडील मैदानाजवळ,घटनपाडा नंबर 02, दहिसर (पूर्व)या ठिकाणी कचऱ्यामधे बेवारस स्थितीत " एक पिस्टल आणि 04 राऊंड " मिळून आले आहेत.
अधिक चौकशी केली असता सदरचं पिस्टल हे त्या भागात राहणाऱ्या एका 12 वर्षाच्या मुलानं खेळत असताना पाहिलं. खेळण्यातील समजून त्याचेकडून चुकून 1 राऊंड फायर झाला आहे. सदर घटनेमधे कोणालाही इजा किंवा दुखापत झालेली नाही.
सदर घटनेबाबत बाबत अज्ञात व्यक्ती विरुद्ध कलम 3, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच पोलीस पुढील योग्यतो तपास करुन आरोपीचा शोध घेत आहोत. ती बंदूक कुणाची हे पोलीस तपासानंतर स्पष्ट होईल.


















