Sunil Shukla : मुंबईतील 1 कोटी मराठी 5 पक्षात विभागलेत, 1 कोटी उत्तर भारतीय एकत्र आल्यास महापौर होऊ शकतो, मनसेची मान्यता रद्द करावी म्हणून लढणाऱ्या सुनील शुक्लाचा दावा
Sunil Shukla : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत उत्तर भारतीयांनी एकत्र येत उत्तर भारतीय विकास सेनेकडून निवडणूक लढवण्याचं आवाहन सुनील शुक्लानं केलं आहे.

मुंबई : एक कोटी उत्तर भारतीय मुंबईचा महापौर ठरवतील, असं उत्तर भारतीय विकास सेनेच्या सुनील शुक्ला यांनी म्हटलं आहे. उत्तर भारतीय लोकांनी मतदान उत्तर भारतीय उमेदवारांना केल्यास मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होईल, असं म्हटलं. मुंबईच्या महापौरपदाबाबत सुनील शुक्ला यांनी केलेल्या वक्तव्यामुळं संतापाची लाट पसरली आहे. मनसेच्या योगेश चिले यांनी सुनील शुक्ला यांना गांभीर्यानं घेण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. सुनील शुक्ला यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन या संदर्भातील व्हिडिओ 22 जूनला पोस्ट करण्यात आला आहे.
सुनील शुक्ला काय म्हणाले?
जर मी तुम्हाला विश्वास दिला तर मुंबई महापालिकेत उत्तर भारतीयांचं राज्य असेल, मुंबई आर्थिक राजधानी आहे. जिचं बजेट 55 हजार कोटींचं आहे. मुंबईची लोकसंख्या 2 कोटी 20 लाख आहेत. 1 कोटी उत्तर भारतीय, 1 कोटी मराठी,20 लाख इतर आहेत. मराठी समाज 5 राजकीय पक्षात विभागलेला आहे. काही जण उद्धव ठाकरे, काही जण एकनाथ शिंदेंना, काही जण राज ठाकरेंना आणि काही लोक भाजपला मतदान करतील. काही जण काँग्रेसला मतदान करतील, असं सुनील शुक्ला म्हणाले.
उत्तर भारतीय इथं पीडित आहेत, वंचित आहेत. या वेळेला उत्तर भारतीयांना एकत्र यावं लागेल, कारण त्यांना मारलं जात आहे. उत्तर भारतीय विकास सेना एक पर्याय म्हणून उभी आहे. उत्तर भारतीय उमेदवाराला उभं केलं, त्याला मतदान केलं तर 10 पैकी 3 लोक मतदान करतील तर तुमचा महापौर होईल, असं सुनील शुक्ला यांनी असं म्हटलं आहे. मराठी समाजाचा विचार केला पाच पक्ष आहेत. त्यांनी 100 पैकी 20-20 टक्के मतं घेतली तर ते वर येऊ शकणार नाहीत. तुमची सत्ता येऊ शकते, एकत्र या, अखेरची वेळ आहे. मुंबईत टिकून राहायचं असल्यास एकत्र या.मी काही निवडणूक लढणार नाही पण उत्तर भारतीयांना निवडणुकीला उभं करणार आहे. मुंबईतील 227 जागा लढवणार आणि जिंकणार, आपला महापौर निवडणार आहे. हे स्वप्न नाही वास्तव आहे, असं सुनील शुक्ला म्हणाले. तुम्ही मतदान केलं तर तुमची सुरक्षा सुनिश्चित होईल, असं सुनील शुक्ला म्हणाले.
मनसेचे योगेश चिले काय म्हणाले?
मनसेचे नेते योगेश चिले यांनी सुनील शुक्ला यांच्या मुंबईच्या महापौरपदाबद्दलच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे. पहिली भाषा रुढ करायची, त्यानंतर राजकीय अस्तित्व दाखवायचं त्याला आमचा विरोध आहे. सुनील शुक्ला याला गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. सुनील शुक्लाला विधानसभेला 300 मतं मिळाली होती, असं योगेश चिले म्हणाले. मराठी माणसाशिवाय दुसरा कोणी महापौर होणार नाही, असं योगेश चिले यांनी म्हटलं. मराठी माणसासाठी जो पक्ष उभा राहतो, जो पक्ष मराठीसाठी भांडतो त्याच्या मागं मराठी माणसानं उभं राहावं, असं योगेश चिले म्हणाले. प्रादेशिक पक्षांचं बळ मराठी माणसानं वाढवण्याची गरज असल्याचं म्हटलं.
विधानसभेला साडेतीन लाखांच्या मतदारसंघात योगेश चिलेला 300 मतं मिळाली आहे. उत्तर भारतीय, बिहारी माणसं सुनील शुक्ला याच्या मागं नसल्याचं म्हटलं. योगेश चिले एका मराठी वृत्तवाहिनीसोबत बोलत होते.
कोण आहेत सुनील शुक्ला?
सुनील शुक्ला हे उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष आहेत. काही दिवसांपूर्वी सुनील शुक्ला यांनी मनसेची राजकीय पक्ष मान्यता रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका केली होती.
























