महादेव मुंडे प्रकरणाच्या न्यायासाठी आज ग्रामस्थांचा एल्गार, परळी-अंबाजोगाई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन, मुंडे कुटुंबीय देखील उतरणार रस्त्यावर
Mahadev Munde Case : महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास एसआयटी आणि सिआयडी मार्फत करण्यात यावा, यासाठी आज परळी-अंबाजोगाई महामार्गावर कन्हेरवाडी आणि भोपळा ग्रामस्थांकडून रास्तारोको आंदोलन केले जाणार आहे.

बीड : परळीतील व्यापारी महादेव मुंडे (Mahadeo munde) खून प्रकरणाचा तपास एसआयटी आणि सिआयडी मार्फत करण्यात यावा, यासाठी आज (25 जुलै) परळी - अंबाजोगाई महामार्गावर कन्हेरवाडी आणि भोपळा ग्रामस्थांकडून रास्तारोको आंदोलन केले जाणार आहे. ग्रामस्थांकडून हे आंदोलन आज सकाळी 11 वाजता रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात महादेव मुंडे कुटुंबीय देखील रस्त्यावर उतरणार आहे. ऑक्टोबर 2023 साली महादेव मुंडे यांचा तहसील समोरील मैदानात निर्घुनपणे खून करण्यात आला होता.
या प्रकरणाला 21 महिने उलटून गेले. तरी अद्यापही महादेव मुंडे यांचे मारेकरी मोकाटच आहेत. आरोपींना अटक व्हावी यासाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर दोन वेळेला आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील महादेव मुंडे कुटुंबीयांची परळीत भेट घेत न्यायाच्या लढाईत सोबत असल्याचे सांगितले होते. मात्र अद्याप या प्रकरणी न्याय मिळत नसल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रशासन पहिल्यापासूनच आरोपीचे पाठराखण करतय- ज्ञानेश्वरी मुंडे
दरम्यान, एका लेकीला आणि सुनेला न्याय देण्यासाठी केल्या जाणाऱ्या रास्ता रोको आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलेय. हे आंदोलन आपल्याला शांतपणे करायचे असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. प्रशासन पहिल्यापासूनच आरोपीचे पाठराखण करत असून अद्याप या प्रकरणात प्रशासनाची हालचाल दिसून येत नसल्याची ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या आहेत.
महादेव मुंडे यांचा खून वाल्मीक कराड आणि त्याच्या मुलानेच केलाय- विजय सिंह बांगर
तर दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्ते विजय सिंह बांगर महादेव मुंडे खून प्रकरणातील पुराव्यांची फाईल घेऊन नुकतेच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेले होते. महादेव मुंडे यांच्या खूनाचा शवविच्छेदन अहवाल, क्रूर हत्येचे फोटोज, एफआयआर आणि आतापर्यंत देण्यात आलेले निवेदन या सर्वांची फाईल जरांगे पाटील यांच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोचवली जाणार आहे. तर आज महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना अटक केली जावी. या मागणीसाठी परळीत मोर्चा निघणार आहे. या मोर्चात जरांगे पाटील यांनी सहभागी व्हावे यासाठी विनंती करण्यात आली. दरम्यान महादेव मुंडे यांचा खून वाल्मीक कराड आणि त्याच्या मुलानेच केल्याचा आरोप पुन्हा एकदा बांगर यांनी केलाय.


















